अकोला : मान्सूनपूर्व कापूस लागवडीतून बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून पश्चिम विदर्भातील अनेक भागात शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व कापूस लागवड करण्यात येते. त्यामुळे १ जूननंतरच कपाशी बियाणे विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम छेदण्यासाठी मान्सूनपूर्व कापूस लागवड थांबविणे गरजेचे आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला. मान्सूनपूर्व कापसाची लागवड केली तर कपाशीच्या उत्पादनात वाढ होत असल्याचा शेतकऱ्यांचा तर्क आहे. कापूस उत्पादक पट्ट्यात मान्सूनपूर्व कापूस लागवड करण्याची प्रथा वाढली. याचा दुष्परिणाम स्वरूप गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. २०१७ मध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्यानंतर हा प्रकार प्रकर्षाने समोर आला. यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यातून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी झाला. गुलाबी बोंडअळीचे चक्र भेदण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशी लागवड थांबविण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – अकोला : आधारकार्ड तात्काळ अद्ययावत करा, नाहीतर..
कपाशीची मान्सूनपूर्व लागवड टाळण्यासह बोंडअळीचा जीवनक्रम भेदण्यासाठी जूननंतरची लागवडच उपयुक्त ठरते. कोषावस्थेत जाणाऱ्या अळीच्या विस्ताराचे चक्र थांबविता येणार आहे. १ जूनपूर्वी कपाशी बियाणांची विक्री न करण्याच्या सूचना कृषि निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
परवाना रद्द होणार
कृषि विभागाचा निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण विभागाने शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे १ जूननंतरच विक्री करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. १ जूनपूर्वी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी कपाशी बियाण्यांची विक्री केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. असे आढळून आल्यास घाऊक व किरकोळ विक्रेत्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा देण्यात आला.