नागपूर: समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रित करण्यासाठी वाहन चालवणाऱ्यांचे सक्तीने समुपदेशन समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर ते शिर्डी मार्गावर ८ समुपदेशन केंद्र तयार केले जाईल. मंगळवारी नागपुरात परिवहन खाते व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बैठकीत हा निर्णय झाला.
सोमवारी परिवहन उपायुक्तांनी शिर्डी ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्गाचे निरीक्षण केले. मंगळवारी कळसकर यांनी नागपुरात आरटीओ अधिकारी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. यावेळी अपघातांच्या कारणांवर चर्चा करून येत्या सात दिवसांतएमएसआरडीसीला प्रत्येक जिल्ह्यात एक प्रमाणे नागपूर ते शिर्डी दरम्यान एकूण ८ समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी जागा मागण्यात आली. तेथे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांना सक्तीने रोखून ३० मिनिट ते १ तास समुपदेशन आरटीओकडून होईल. समुपदेशनानिमित्त प्रथम रस्ते सुरक्षीततेचे चलचित्र दाखवणे, एक प्रश्नपत्रिका या चालकाकडून सोडवून घेणे, चालकाकडून पून्हा धोकादायक वाहन चालवले जाणार नाही असे शपथपत्र घेतले जाईल.
सोबत टायरमध्ये हवा कमी- अधिक राहण्याचे धोके आणि टायर घासलेले असल्यास होणारे परिणामाचीही माहिती दिली जाणार असल्याचे कळसकर यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. समुपदेशनानंतर चालान देऊन चालकाला पुढच्या प्रवासासाठी सोडले जाईल. सोबत एमएसआरडीसीला रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती फलक वाढवणेसह इतरही बऱ्याच महत्वाच्या सूचना यावेळी दिल्या गेल्या. बैठकीला मुंबईचे परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर) रवींद्र भुयार आणि (नागपूर ग्रामीण) विजय चव्हाण एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी बालाजी मंगम आणि इतर अधिकारी उपस्थित होते.