तीन वर्षांतील आकडेवारी; अनेकांचे बेकायदा वास्तव्य; केंद्रीय गृहखात्याकडून माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बोबडे

नागपूर : मागील तीन वर्षांत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही सव्वालाख परदेशी नागरिक बेकायदा भारतात राहत असल्याचे केंद्र व राज्याच्या तपासणीत आढळून आले आहे.  विशेष म्हणजे, दरवर्षी सापडणाऱ्या अशा नागरिकांची संख्या कमी कमी होत आहे. भारतात आलेल्या विदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची नियमित तपासणी केली जाते. त्यातून वरील बाब निदर्शनास आली. गृहखात्याने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत एकूण १ लाख १९ हजार ९५८ विदेशी नागरिक त्यांचा व्हिसा संपल्यावरही देशातच होते. २०१९ मध्ये ५४ हजार ५७६, २०२० मध्ये ४० हजार २३९ आणि  २०२१ मध्ये २५ हजार १४३ परदेशी नागरिक देशात असल्याचे निदर्शनास आले. २०१९ पूर्वीपर्यंत संपूर्ण देशात ही संख्या ३ लाख ९३ हजार ४३१ होती, हे येथे उल्लेखनीय.

परदेशी कायदा १९४६च्या कलम ३(२) अन्वये केंद्र व राज्य सरकार व त्यांच्या तपास यंत्रणांना बेकायदा देशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे अधिकार आहेत. या कायद्याच्या आधारे गुप्तचर यंत्रणांची मदत घेऊन वरील नागरिकांचा शोध घेतला जातो. तसेच त्यांचा देशविघातक कृत्यात सहभाग आहे का, याचीही तपासणी केली जाते.

शिक्षण, व्यवसाय तसेच अन्य कारणांसाठी विविध देशातील नागरिक भारतात येतात. त्यांच्यावर तपास यंत्रणांची नजर असते. अनेक जण व्हिसा संपल्यावरही परत जात नाही, असे पोलीस तपासात आढळून येते.  नागपुरात २०२१ मध्ये एक अफगाण नागिरक सापडला होता. त्यानंतरच्या तपासणीत सुमारे २५०० परदेशी नागरिक बेकायदा नागपूर शहर आणि परिसरात राहात असावे, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली होती. २०२१ जानेवारीमध्ये  पालघरमध्येही नायजेरिया व युगांडाचे नागरिक सापडले होते. गेल्या काही वर्षांपासून तपास यंत्रणाकडून याबाबत अधिक काळजी घेतली जात आहे.

तीन वर्षांत पकडलेले परदेशी नागरिक

  वर्ष             संख्या 

 २०१९     ५४ हजार ५७६  

 २०२०     ४० हजार २३९

 २०२१     २५ हजार १४३