नागपूर : सकाळी फिरायला गेलेल्या पती-पत्नीने कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेकोलीच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती पाण्यात वाहून गेला तर पत्नीला वाचविण्यात यश आले. ही घटना कन्हान नदीच्या पारशिवनी पुलावर बुधवारी सकाळी ६ वाजता घडली. प्रशांत शेषराव पोटोडे (४०. नवीन बिना, भानेगाव) असे मृत पतीचे तर संध्या शेषराव पोटोडे (३५) असे वाचविण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा >>> मूल होत नसल्याने पत्नीचा खून केला आणि मृतदेहाजवळ तब्बल सहा तास…
प्रशांत पोटोडे हा सीडीएसएस सेक्युरिटी फोर्स लिमिटेड कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीवर होता. प्रशांत याने एक वर्षांपूर्वी नवीन बिना येथे घर विकत घेतले होते. तेथे पत्नी संध्या व सातव्या वर्गात शिकणारा मुलगा कमलेशसोबत राहत होता. बुधवारी प्रशांत व संध्या पारशिवनी टी पॉईंट ते सावली मार्गावर असलेल्या कन्हान नदी-पारशिवनी पुलाकडे फिरायला गेले. पारशिवनी पुलावरून पती-पत्नीने कन्हान नदीत उडी घेतली. प्रशांत हा वाहत्या पाण्यात पडल्याने वाहून गेला तर संध्या वाहून जात असतांना वेकोली कर्मचाऱ्यांना दिसली. कर्मचाऱ्यांनी पाण्यात उडी घेऊन संध्याचा जीव वाचविला.
हेही वाचा >>> भंडारा : अपत्य प्राप्तीचा दावा करणे ज्योतिषांना भोवले!
भोवळ येऊन पडल्याचा दावा
दाम्पत्याने नदीत उडी घेतल्याची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस तेथे पोहचले. त्यांनी संध्याला रुग्णालयात दाखल केले. ‘आम्ही मॉर्निंग वॉकसाठी आलो होतो. नदीवरील पुलावर बसून गप्पा करीत होतो. माझ्या पतीला अचानक भोवळ आली आणि नदीत पडले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात माझाही तोल गेल्याने पाण्यात पडली.’ असा दावा संध्याने पोलिसांना दिलेल्या माहितीत केला. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती बघता दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. पारशिवनी पुलाच्या कठड्यावर प्रशांतचा दुपट्टा बांधलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे प्रशांत व संध्या यांनी आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी घेतली का? किंवा घातपात आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
काही बाबी संशयास्पद प्रशांतने घर विकत घेतल्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले होते. तसेच तो सध्या आजारी असल्याने कामावरही जात नव्हता. संध्याने मुलाला एका दिवसांपूर्वीच मावशीकडे राहायला पाठवले होते. तसेच संध्या आणि प्रशांत हे कधीच एवढ्या दूरपर्यंत फिरायला जात नव्हते. त्यामुळे नदीत तोल जाऊन पडल्याच्या दाव्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.