लोकसत्ता टीम

नागपूर: प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही असे म्हणतात ते खरच आहे. नागपूरच्या एका दाम्पत्याने हे करून दाखवले आहे. विदर्भात अत्यंत कडक ऊन असलेल्या भागात केशरची शेती होत असल्याचे कोणी सांगितल्यास विश्वास बसणार नाही. मात्र, नागपूरच्या एका युवा दाम्पत्याने हा व्यवसाय शक्य करवून दाखवला आहे, तेसुद्धा ४०० चौरसफूट खोलीत. अक्षय होले आणि दिव्या लोहकरे-होले या दाम्पत्याने जगातील सर्वात महागड्या पिकांपैकी एक समजल्या जाणाऱ्या केशरचे उत्पादन माती आणि पाण्याविना करून दाखवले आहे. या शेतीच्या माध्यमातून हे दाम्पत्य ५० लाखांचे वार्षिक उत्पन्न घेत आहेत.

अक्षयने बीबीएपर्यंतचे शिक्षण घेतले असून दिव्या या बँकेत कार्यरत आहेत. २०२०पासून होले दाम्पत्याने लोकसेवानगरातील एका गच्चीवर ८० चौरस फूट जागेत या व्यवसायाला सुरुवात केली. ‘केशर हे अत्यंत महागडे असते. याला मोठी मागणी असली तरी देशातील याचे उत्पादन त्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे आम्ही याचे उत्पादन घेणे सुरू केले’, असे अक्षयने सांगितले. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी दाम्पत्याने साडेतीन महिने काश्मीरमध्ये घालवले. यात केशरची शेती कशी करतात, त्याच्याशी संबंधित विविध बाबींचा अभ्यास केला.

सुरुवातीला होले दाम्पत्याने एक किलो बिया आणल्या. या माध्यमातून सुरुवातीला केवळ काही ग्रॅम केशरचे उत्पादन घेतले. यात यश मिळू लागल्यावर हळूहळू याचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर जवळपास ३५० किलो बिया आणल्या. यातून जवळपास १६०० ग्रॅम केशरचे पीक घेण्यात आले. उत्पादन वाढू लागल्यानंतर दोन ठिकाणी प्रत्येकी ४८० चौरस मीटर जागेवर याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. यामध्ये हिंगणा येथे राहत असलेल्या फ्लॅटच्या ४०० चौरस फूट जागेचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

अखेर होले दाम्पत्याच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळू लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते वर्षाला ४० ते ५० लाख रुपयांचे वार्षिक उत्पादन घेत असून यात उत्पादन घेण्यास इच्छुक असलेल्यांना मार्गदर्शनही करीत आहेत. आतापर्यंत जवळपास १५० लोकांना प्रशिक्षणही दिले असून यापैकी २९ जणांनी त्यांच्या राज्यात स्वत:चे उत्पादन घेणे सुरु केले असल्याचे अक्षयने सांगितले. या दाम्पत्याकडून प्रशिक्षण व स्वत:चे युनिट टाकून देण्यासाठी १५ हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. अलीकडच्या काळात केशरचे उत्पादन चांगलेच वाढले आहे.

गेल्यावर्षी होले दाम्पत्याच्या युनिट व त्यांच्या भागीदारांनी मिळून जवळपास ४५ किलो केशरचे उत्पादन घेतले होते. १०० चौरस फूट केशर निर्मितीचे युनिट सुरू करण्याचा खर्च १० लाख असून दरवर्षी यातून पाच लाखांचे उत्पादन घेता येते. या व्यवसायात एकदाच गुंतवणूक करावी लागते, असेही अक्षयने सांगितले.

Story img Loader