लोकसत्ता टीम
अकोला : कौटुंबिक मतभेदातून पती-पत्नीच्या पवित्र नात्यामध्ये दरी पडून संसार मोडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. या वादावर सामंजस्यातून फुंकर घालण्याची आवश्यकता असते. अकोल्यात ६८ वर्षांचे पती, तर ६६ वर्षांच्या पत्नीने आपसी वादातून घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी चढली. लोकअदालतमध्ये समन्वयातून त्यांचे मनपरिवर्तन केल्याने या वयात पुन्हा एकदा त्यांचा संसार फुलला आहे.
संसारात पती-पत्नीमध्ये मतभेद होतात. त्यातून निर्माण होणाऱ्या वादातून टोक गाठले जाते. हा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचून संसाराच्या गाठी सोडवून घेण्याकडे दाम्पत्याचा कल असतो. कौटुंबिक वादातून घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये तरुणांसह ज्येष्ठ दाम्पत्याचे देखील प्रमाण मोठे आहे. अकोल्यात अशाच एका प्रकरणामध्ये ज्येष्ठ दाम्पत्याचे एकत्रिकरण घडवून आणले.
आणखी वाचा-नवे महसूल मंत्री म्हणतात, महसूल खात्यात कायद्यात सुधारणा आवश्यक
पतीचे वय ६८, तर पत्नीचे ६६ वर्षांचे वय. दोघेही सेवानिवृत्त झालेले. त्यांना दोन अपत्य आहेत. त्यापैकी एका अपत्याचे लग्नही झालेले आहे. तरीही या ज्येष्ठ दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्याने त्यांनी शेवटी संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे अकोला येथील कौटुंबिक न्यायालयात प्रकरण घटस्फोटासाठी दाखल केले. प्रकरण समुपदेशकाकडे पाठविण्यात आले. तरीही या वयात घटस्फोट घेणेसाठी पती-पत्नी ठाम राहिले होते.
हे प्रकरण डिसेंबर महिन्याच्या लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आले. लोकन्यायालयात पती-पत्नी एकत्रिकरणावर भर देण्यात आला. पॅनलचे सदस्य, न्यायाधीश, समुपदेशक गांजरे आदींनी पती-पत्नीची समजूत काढली. समन्वयातून त्या दोघांचेही मनपरिवर्तन करण्यात यश आले. घटस्फोटासाठी संमतीने न्यायालयात आलेले ज्येष्ठ दाम्पत्य एकत्र संसार करण्यासाठी आनंदात घरी निघून गेले. लोकअदालतमधील प्रयत्नातून दोघांचा संसार पुन्हा एकदा फुलला आहे. कौटुंबिक वाद लोकन्यायालय, मध्यस्थी केंद्रामध्ये ठेऊन मिटवावे, असे आवाहन कौंटुबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नंदा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.
आणखी वाचा-वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?
१२ दाम्पत्य एकत्र नांदण्यास तयार
घटस्फोटासाठी प्रयत्न करणाऱ्या १२ प्रकरणांमध्ये पती-पत्नी एकत्र नांदण्यास तयार झाले. अनेक वर्षापासून सोबत न राहणारे पती-पत्नी त्यांचा सुखी संसारात पुन्हा परतले आहे. अनेक प्रकरणे १० वर्ष जुनी होती. लोकअदालतमध्ये ते प्रकरणे निकाली निघाली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार घेण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये १२ घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये समेट घडविण्यात आला. त्या दाम्पत्याचे संसार पुन्हा एकदा फुलले आहेत. -योगेश पैठणकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.