नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग करण्याच्या प्रकरणामध्ये आरोपी जनार्दन गुलाबराव मून आणि जावेद गफूर पाशा यांना नागपूर सत्र न्यायालयाने अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. तपासाला सहकार्य करावे, अशा सूचना देत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीनाचा अर्ज मंजूर केला. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एम. कणकदंडे यांनी हा निर्णय दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे यांनी केलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी या आरोपींविरुद्ध २ एप्रिल २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. मून यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने संस्था स्थापन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही.
हेही वाचा…धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही!
मून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा वारंवार दुरुपयोग करतात. मून यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने २३ मार्चला पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काँग्रेस पक्षाला समर्थन देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी झाली व समाजात संभ्रमाचे वातावरण पसरले, अशी पोलिसात तक्रार करण्यात आली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना अटकपूर्व जामीन दिला आहे. आरोपींच्या वतीने अॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.