बुलढाणा : पत्नीस शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने चिखली तालुक्यातील एका नराधम पतीस पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सुभाष ज्ञानदेव उगले असे आरोपीचे नाव आहे. त्याचा विवाह लक्ष्मीशी झाला होता. सुभाष उगले हा दारूच्या आहारी गेलेला होता. तो लक्ष्मीस शिविगाळ व मारहाण करत असे. लक्ष्मीचा दीर उमेश उगलेही तिला त्रास देत होता.

मागील २५ ऑगस्ट २०१८ रोजी सुभाष आणि उमेश मद्यप्राशन करून घरी आले होते. त्यांनी मुलांना अकारण मारहाण केली असता लक्ष्मीने विरोध केला. यावर सुभाष उगले याने लक्ष्मी उगले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नेहमीचा हा त्रास असह्य झाल्याने लक्ष्मीने विषारी औषध घेतल्याने तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा – खासगी बसेसमध्ये आता विमानाप्रमाणे प्रवाशांना सूचना!

हेही वाचा – नागपूर : वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच सारंगचा मृत्यू, नागपुरे कुटुंबियांना अश्रू अनावर

मृत लक्ष्मीची आई सुनीता सवडतकर हिने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरण बुलढाणा न्यायालयात सुनावणीसाठी आले. सरकारतर्फे ९ साक्षीदार सादर केले. मृत्यूपूर्व जबाब, तिच्या आईची व शेजार्‍यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) एस. बी. डिगे यांनी सुभाष यास पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. आशिष केसाळे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस जमादार नंदाराम इंगळे यांनी सहकार्य केले.

Story img Loader