चंद्रपूर : ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली ताडोबा प्रशासनाची १२ कोटी १५ लाखांची फसवणूक केलेल्या अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन्ही भावडांनी १२ ऑक्टोबरपूर्वी ३ कोटी रुपये ताडोबा प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा जंगल सफारीसाठी अभिषेक व राेहित ठाकूर यांच्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन नावाच्या कंपनीमध्ये ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत करार करण्यात आला. या करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करू लागली. २०२० ते २०२३ या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फाउंडेशनकडे जमा करायची होती. मात्र, या कंपनीने केवळ १० कोटी जमा करून ताडोबा व्यवस्थापनाला १२ कोटी १५ लाख ५० हजारांनी गंडा घातला. चार वर्षांच्या लेखापरीक्षणानंतर ही बाब समोर आल्याने या कंपनीविरुध्द रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर दोघेही फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता.

हेही वाचा >>>माजी खासदार डाॅ. खुशाल बोपचे शरद पवारांच्या गटात ; प्रफुल पटेल गटाला पुन्हा हादरा

न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असता १२ ऑक्टोबरपर्यंत ३ कोटी रुपये ताडोबा व्यवस्थापनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच ताडोबा व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचेदेखील निर्देश दिले आहे. दरम्यान, नागपूर खंडपीठाने या सर्व बाबी लक्षात घेत ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दर सोमवारी या दोघांनाही रामनगर पोलीस ठाण्यात जावून दोन तास तपासात सहकार्य करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

याप्रकरणी अधिक माहितीसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना विचारले असता, ठाकूर बंधूंना ३ कोटी रुपये १२ ऑक्टोंबरपर्यंत ताडोबा व्यवस्थापनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रक्कम जमा केली नाही तर १३ ऑक्टोबर रोजी यावर पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court order against vinod kumar thakur and rohit vinod kumar thakur in tadoba safari booking fraud case rsj 74 amy