अकोला : शहरातील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याच्या आरोपाप्रकरणी अकोला सेशन कोर्टानं नुकताच निकाल जाहीर केला असून चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. वसीम चौधरी यांच्या शिकवणी वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात २२ मे २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती. मुलीसोबत मोबाइलवरून चॅटिंग करणे, खोलीवर बोलावून अश्लील चाळे केल्याप्रकरणी वसीम चौधरींविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (अ, ब, ड) विनयभंग करणे, पोक्सोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी दिली होती. या गुन्ह्याचा तपास सिव्हिल लाईन पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी केला. पोलिसांनी या आरोपीवरील गुन्ह्यात भादंवि ३७५ क कलमाची वाढ केली होती, ज्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
UPDATE: २४ एप्रिल २०२३ रोजी या प्रकरणी न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला आहे. आरोपीची इंडियन पीनल कोड, आर्म्स अॅक्ट व पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अकोला यांनी निरीक्षण नोंदवले की, “आरोपीने त्यांच्यावर केलेल्या आरोपांपैकी कुठलाही गुन्हा केला नसल्याची माझी खात्री पटली आहे.” सदर आदेश २४ एप्रिल २०२३ रोजी देण्यात आला.