नागपूर: रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे मोठे रॅकेट समोर आले आहे. सख्ख्या बहिण-भावाने नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढत तब्बल १२.६५ लाखांची फसवणूक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. अलिशा आनंद कैथा (२३) व अंकित आनंद कैथा (२१, संजीवनी क्वॉर्टर, यशोधरानगर) अशी आरोपी भाऊबहिणीची नावे आहेत. रेल्वेत आपली वरपर्यंत ओळख असल्याचे सांगत त्यांनी फसवणूकीचे रॅकेट रचले.

हेही वाचा… नागपूर: चारित्र्याच्या संशय! पत्नीच्या पोटात भोसकला चाकू

गणेशन शिवलाल सागर (६१, पाचपावली) यांच्या मुलाला नोकरी हवी होती. गणेशन यांची त्यांचा मित्र दीपक तुमडामच्या माध्यमातून २०२१ साली आरोपींशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची धंतोली बगिच्यात भेटदेखील झाली. ५ मे २०२१ ते २२ मे २०२३ या कालावधीत अलिशा व अंकीतने त्यांच्याकडून सव्वातीन लाख रुपये घेतले. मात्र कुठलीही नोकरी लावून दिली नाही. त्यांना विचारणा केली असता ते आज काम होईल, उद्या काम होईल, असे म्हणत टाळाटाळ करत होते. आपली फसवणूक झाल्याचे गणेशन यांच्या लक्षात आले.

हेही वाचा… गोंदिया: अंधारात उभ्या ट्रकला मागून आलेल्या भरधाव ट्रकची धडक; तिघांचा जागीच मृत्यू

त्यांनी आणखी माहिती काढली असता आणखी तीन जणांनादेखील आरोपींनी असेच जाळ्यात ओढले होते. आरोपींनी त्यांच्याकडून एकूण १२.६५ लाख रुपये उकळले होते. त्यांना पैसे परत मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. अखेर गणेशन यांनी धंतोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर ठकबाज भाऊबहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनी या पद्धतीने आणखी लोकांनादेखील फसविले असल्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cousins cheated the unemployed to the tune of 12 65 lakhs in the name of employment in dhantoli nagpur adk 83 dvr
Show comments