महेश बोकडे

नागपूर: करोनाची तिसरी लाट ओसरल्यावर प्रथमच नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी २४ तासात तब्बल ४३ नवीन करोनाग्रस्तांची नोंद झाली. या रुग्णांपैकी निवडक जणांचा अपवाद वगळल्यास संक्रमित रुग्णांची जिल्ह्याबाहेर प्रवासाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

महापालिकेच्या निरीक्षणानुसार, करोनाच्या पहिल्या तीन लाटांमध्ये बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना विषाणूचे संक्रमण होण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु सध्या करोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये विषाणूचे संक्रमण आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे. यातच गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली, मुंबईसह इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्यांमध्ये विषाणूचे संक्रमण आढळत होते. परंतु शुक्रवारी आढळलेल्या एकूण ४३ रुग्णांपैकी निवडक रुग्ण सोडले तर इतर जिल्ह्याबाहेर गेले नव्हते.

दरम्यान, रुग्णवाढीमुळे  संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्याचा ताण आरोग्य विभागावर वाढला आहे. नवीन रुग्णांमधील लक्षणे तीन दिवसांत नाहीसे होतात. यापूर्वीच्या लाटेमध्ये रुग्णांमध्ये सात दिवस लक्षणे दिसत होती.

नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ९९ हजार ७४५, ग्रामीण १ लाख ६८ हजार २५३, जिल्ह्याबाहेरील ९,९७८ अशी एकूण ५ लाख ७७ हजार ९७६ रुग्णांवर पोहचली आहे. तर दिवसभरात शहरात २, ग्रामीणला १, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शुक्रवारी शहरात ६७, ग्रामीणला ३२, जिल्ह्याबाहेरील ३ असे एकूण १०२ सक्रिय (उपचाराधीन) रुग्ण नोंदवले गेले.

Story img Loader