२४ तासांत १६ मृत्यू; नवीन ६८५ रुग्ण
नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत १६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६८५ नवीन रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, अडीच महिन्यांनी येथील सक्रिय रुग्णांची संख्या १० हजारांहून खाली नोंदवली गेली.
४ मार्च २०२१ रोजी जिल्ह्य़ात ९ हजार ६३१ सक्रिय रुग्ण होते. ५ मार्च रोजी ही संख्या १० हजार ४३२, ६ मार्चला १० हजार ७४६ वर गेली. त्यानंतर २९ एप्रिलला ही संख्या थेट ७७ हजार ६२७ वर पोहोचली होती. परंतु आता करोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बुधवारी शहरात ५ हजार ४६८, ग्रामीणला ४ हजार २९५ असे एकूण ९ हजार ७६३ रुग्ण होते. त्यातील गंभीर संवर्गातील २ हजार ६११ रु्ग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर ७ हजार १५२ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दिवसभरात शहरात ४, ग्रामीणला ७, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण १६ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार २१३, ग्रामीण २ हजार २७३, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३५२ अशी एकूण जिल्ह्य़ात ८ हजार ८३८ रुग्णांवर पोहोचली. २४ तासांत शहरात ३३९, ग्रामीणला ३४१, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण ६८५ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख २९ हजार ९४२, ग्रामीण १ लाख ४१ हजार २२०, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ५३४ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ७२ हजार ६९६ रुग्णांवर पोहोचली आहे.
करोनामुक्तांचे प्रमाण ९६.११ टक्क्यांवर
शहरात दिवसभरात ७०४, ग्रामीणला १ हजार ५० असे एकूण १ हजार ७५४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख १९ हजार ८४७, ग्रामीण १ लाख ३४ हजार २४८ अशी एकूण ४ लाख ५४ हजार ९५ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत हे करोनामुक्तांचे प्रमाण सुधारून ९६.११ टक्के नोंदवले गेले.
चाचण्यांची संख्या १६ हजारांवर
शहरात दिवसभरात ११ हजार ३९५, ग्रामीणला ५ हजार ४५४ अशा एकूण १६ हजार ८४९ चाचण्या झाल्या. ही संख्या मंगळवारी १४ हजार १४५ एवढी होती.
विदर्भात २४ तासांत ८६ मृत्यू; नवीन ३,४१३ रुग्णांची भर
नागपूर : विदर्भाच्या अकरा जिल्ह्य़ांत २४ तासांत ८६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर ३ हजार ४१३ नवीन रुग्णांची भर पडली. करोना मृत्यूची संख्या अनेक आठवडय़ांनी शंभरखाली नोंदवण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
विदर्भात २२ मे रोजी १३५ मृत्यू, २३ मे रोजी ११६ मृत्यू, २४ मे रोजी १०८ मृत्यू, २५ मे रोजी १०४ करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले होते. बुधवारी ही मृत्यूसंख्या ८६ रुग्णांवर आली. २४ तासांत दगावलेल्यांमध्ये नागपूर शहरातील ४, ग्रामीणचे ७, जिल्ह्य़ाबाहेरील ५ अशा एकूण १६ रुग्णांचा समावेश होता. ही नागपुरातील गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी मृत्यूसंख्या आहे. तर नागपूर जिल्ह्य़ात दिवसभरात ६८५ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील १८.६० टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत ९ मृत्यू तर ५२८ नवीन रुग्ण आढळले, चंद्रपूरला ९ मृत्यू तर २७८ रुग्ण, गडचिरोलीत ५ मृत्यू तर ८३ रुग्ण, यवतमाळला ८ मृत्यू तर १६१ रुग्ण, भंडाऱ्यात १ मृत्यू तर २२८ रुग्ण, गोंदियात ५ मृत्यू तर ७६ रुग्ण, वाशीमला ४ मृत्यू तर ३१४ रुग्ण, अकोल्यात ९ मृत्यू तर ३३० रुग्ण, बुलढाण्यात ७ मृत्यू तर ४९१ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात १३ मृत्यू तर २३९ नवीन रुग्ण आढळले.