Nagpur Metro Bridge Cracks : बांधकामाच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या महामेट्रोला आता कामातील त्रुटींमुळे नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे. नागपुरात कामठी मार्गावर गड्डीगोदाममधील आणि वर्धा मार्गावरील मेट्रोच्या पुलाला तडे गेल्याने त्यावरून धावणाऱ्या मेट्रोची गती कमी करण्यात आली आहे. मात्र, ही किरकोळ स्वरुपातील तांत्रिक त्रुटी असून ती दूर करण्यासाठी काम सुरू करण्यात आल्याचे महामेट्रोकडून कळवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील मेट्रोच्या मार्गावर दोन डबल डेकर पूल आणि इतर तत्सम बांधकामामुळे महामेट्रोचे देशभर नाव झाले. या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कारही मिळाले. आता मात्र त्यातील त्रुटी दिसून येत आहे. कामठी मार्गावरील गड्डीगोदामजवळील चार पदरी उड्डाण पुलाला तडे गेल्याने तेथून धावणाऱ्या मेट्रोची गती प्रतितास ८० कि.मी.वरून प्रतितास ३० कि.मी. इतकी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी वर्धा मार्गावरील न्यू एअरपोर्ट ते खापरी दरम्यानच्या एका पुलालाही असेच तडे गेले होते. त्यामुळे तेथील वाहतूक एका दोन ट्रॅकवरून एका ट्रॅकवर करण्यात आली होती.

हेही वाचा – नागपूर: शहरातील युवावर्ग पुन्हा हुक्का पार्लरच्या वाटेवर; पार्लरमालकांचे पोलिसांसोबत ‘अर्थपूर्ण’ संबंध!

यासंदर्भात महामेट्रोने तपशीलवार निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यानुसार गड्डीगोदाम येथे ८० मीटर स्टील गर्डर पूल असून तेथे तडे गेल्याचे (ट्रॅक सेटलमेंट) आढळून आले आहे. ही किरकोळ त्रुटी असून यामुळे दोन्ही ट्रॅकवर परिणाम झाला आहे. पुलाला महामेट्रो आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. मेट्रोच्या सुरक्षित संचालनासाठी गती प्रतिसात ३० किलोमीटर इतकी कमी करण्यात आली. दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत.

हेही वाचा – खळबळजनक! आमदाराच्या आश्रमशाळेत मुलाचा मृतदेह आढळला

वर्धा मार्गावरील न्यू एअरपोर्ट आणि खापरी स्टेशन दरम्यान असलेल्या पुलालाही तडे गेले होते. पाच महिन्यांपूर्वी पुलाच्या एका भागामध्ये १८ मिमी तडे गेल्याचे आढळून आले होते. तसेच पुलाच्या स्लॅबवरही भेगा दिसून आल्या होत्या. ३० डिसेंबर २०१७ मध्ये महामेट्रोने या पुलाचे काम पूर्ण करून तो कार्यान्वित केला होता. साडेपाच वर्षांनंतर त्यात त्रुटी दिसून आली आहे. काळ्या मातीमुळे हा प्रकार घडल्याचा दावा महामेट्रोने केला आहे. पुलाचा दर्जा उत्तम असून व्हीएनआयटी आणि इतर तज्ज्ञ सल्लागारांशी चर्चा करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे महामेट्रोने सांगितले आहे.