नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेला बुटीबोरी उड्डाणपूल निकृष्ट बांधकामामुळे खचल्याचा आरोप होत असून सरकारवर नामुष्कीचे वेळ आली आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदाराचे दुर्लक्ष आणि मर्यादेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या ट्रकचालकावर ठपका ठेवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणात आपले हात झटकले आहेत.
गडकरी नेहमीच बांधकामाच्या गुवत्तेबाबत आग्रही असतात. याची वाच्यताही ते नेहमी त्यांच्या भाषणात करतात. त्यामुळे त्यांच्याच प्रयत्नाने बांधण्यात आलेला बुटीबोरी उड्डाणपूल उत्तम दर्जाचाच असेल, असा सर्वांनाच विश्वास होता. मात्र उद्घाटनानंतर केवळ साडेतीन वर्षात पुलाचा काही भाग खचल्याने बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या निकृष्ट बांधकामाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी १८७ टन वजनाचा ट्रक गेल्याने पुलास तडे गेल्याचे अजब कारण सांगितले आहे. ट्रक चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे दोष दायित्व कालावधीचा आधार घेत संबंधित कंत्राटदारावर या घटनेची जबाबदारी ढकलून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे.