चित्रकला महाविद्यालयात काम सुरू
महाराष्ट्राची आन, बाण आणि शान छत्रपती शिवराय, त्यांचे गडकिल्ले, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारे शिल्प उपराजधानीतील चित्रकला महाविद्यालयात तयार होत आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक त्यासाठी काम करत आहेत. राज्याचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारी ही शिल्प ‘वेलकम टू महाराष्ट्र’च्या रूपाने राज्याच्या चार सीमांवर लावले जाणार आहेत.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. उपराजधानीतील चित्रकला महाविद्यालयामार्फत आदिवासी लोककला, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांच्या वैभवाला साकारण्यासाठी चित्रकारांच्या चमू कार्यरत झाल्या. अवघ्या वर्षभरात या चमूने दोन्ही रेल्वेस्थानकाचा चेहरा बदलला. रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रत्येकासाठी ही स्थानके आकर्षणाचे केंद्र झाले आहे. त्यामुळे याच चमूला आता महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा शिल्परूपात तयार करण्याची जबाबदारी मुनगंटीवार यांनी सोपवली. त्यानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी हे शिल्प साकारण्याच्या कामी लागले आहे.
या शिल्पांमध्ये शिवरायाच्या संस्कृतीपासून तर लावणी आणि उपराजधानीतील दीक्षाभूमीचा समावेश आहे. शिवकालीन नाणे, त्यावरील हस्तलिखिते अशा एकूणएक बारीकसारिक गोष्टी यात साकारल्या जात आहेत. येत्या काही दिवसातच महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणा, छत्तीसगडसह चार राज्यांच्या सीमेवर हे शिल्प त्या राज्याच्या नागरिकांचे स्वागत करताना दिसून येतील. या संपूर्ण कलाकृतीविषयी अधिक माहिती कलाकृती पूर्णत्वास गेल्यानंतरच देण्यात येईल, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.