गोंदिया : वनविभाग, सेवा संस्था व इतर अशासकीय संस्थांच्या सहभागाने यावर्षीही १८ जून रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सारस पक्षी गणना करण्यात येत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील पाणवठ्यांवर ही प्रगणना होणार आहे.
भंडारा जिल्ह्यात सारस पक्ष्यांची गणना वनविभाग, सेवा संस्था आणि सीट संस्थेमार्फत केली जाणार आहे. १७ जून रोजी मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती बालाघाट जिल्ह्यात सेवाभावी संस्था व वनविभाग बालाघाटच्या सहकार्याने सारस गणना करण्यात आली.
हेही वाचा – फडणवीस-बावनकुळेंच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश
सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारस गणना पारंपरिक आणि शास्त्रीय पद्धतीने केली जाते. त्यामुळे सारस पक्ष्यांच्या संख्येचा अंदाज विश्वासार्ह असतो. विशेष म्हणजे, सारस पक्षी आता फक्त महाराष्ट्रात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातच पाहावयास मिळतात.
शिवाय मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात त्यांचे अस्तित्व आहे. ७० ते ८० सारस मित्र, शेतकरी आणि सेवा संस्थेचे सदस्य, गोंदिया वनविभाग व बालाघाट दक्षिण व उत्तर वनविभागाचे ४० ते ५० अधिकारी-कर्मचारी यात सहभागी होणार आहे. त्यामुळे गणनेदरम्यान योग्य आणि विश्वासार्ह निष्कर्ष समोर येतील आणि सारस संवर्धनाचा मार्ग सुकर आणि खात्रीचा होईल.
हेही वाचा – वाशीम : मृग नक्षत्र कोरडेच जाण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत
ही गणना वनविभाग सेवा संस्था आणि इतर अशासकीय संस्थांच्या मार्गदर्शनात होणार आहे. सारस गणनेनंतर उपलब्ध आकडेवारी जाहीर केली जाईल. त्यामुळे दुर्मिळ सारस पक्ष्याची सद्य:स्थिती आणि त्यांची योग्य संख्येचे अचूक विश्लेषण केले जाईल. उल्लेखनीय म्हणजे, गतवर्षी गोंदिया जिल्ह्यात विविध कारणांनी चार सारसांचा मृत्यू झाला. यानंतर वनविभाग, सारसप्रेमी आणि शासनाने सारस संवर्धनाकरिता पावले उचलली आहे.