नागपूर : जलस्त्रोतांना विळखा देणारी जलपर्णी अनेक सुंदर आणि उपयोगी वस्तूंची निर्मिती करु शकते, याची प्रचिती येते ती महापालिकेच्या महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये. बुधवारी ५ मार्च पासून रेशीमबाग मैदानामध्ये मनपाच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याला सुरुवात झाली. या मेळाव्यामध्ये अनेक बचत गट तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांनी आपल्या विभिन्न उत्पादनांचे दालन लावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेशीमबाग मैदानातील २५० दालनमध्ये अनेक दालनमध्ये अनोखे उत्पादने भुरळ घालतात. चंद्रपूर येथील अजय संस्थेद्वारे जलपर्णीपासून निर्माण केलेली उत्पादने ही कुतूहलाचा विषय ठरली आहेत. तलावातील पाण्यावर आपले साम्राज्य पसवून विळखा देणारी जलपर्णी पर्यावरण प्रेमींसाठी डोकेदुखी ठरत आहे. या जलपर्णीपासून सुंदर बहुउपयोगी वस्तू तयार करुन अजय संस्थेने यावर उत्तम उपाय शोधला आहे. जलपर्णीपासून लॅपटॉब बॅग, फाईल फोल्डर, बास्केट, योगा मॅट, डायनिंग व डिनर मॅट, कस्टमाइज गिफ्ट अशा अनेक वस्तूंची निर्मिती संस्थेद्वारे करण्यात आली आहे.

या वस्तू महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध देखील आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी अजय संस्थेच्या श्रीमती स्वाती धोटकर आणि सुषमा तांदळे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले. उद्योगातून सक्षमीकरणासोबतच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाचा पुढाकार असल्याचे उद्गार यावेळी आयुक्तांनी काढले.

बंदीवानांच्या कलाकुसरीला पसंती

महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहामधील बंदीवानांनी तयार केलेल्या वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बंदीवानांची कलाकुसर नागरिकांच्या देखील पसंतीला उतरत आहेत. हातमागावर तयार केलेले टॉवेल, चादर, दरी, रुमाल, दुपट्टे यासोबतच सुतारकामाद्वारे निर्मित वस्तू, शेतीची अवजारे, बेकरी उत्पादने देखील बंदीवानांकडून तयार करण्यात येत आहेत. ही सर्व उत्पादने रेशीमबाग मैदानात कारागृह विभागाच्या स्टॉल्सवर उपलब्ध आहे.

५० रुपये ते २ हजार रुपयांपर्यंतची ज्वेलरी

महिला उद्योजिका मेळाव्यात महिलांचे सौंदर्य प्रसाधने, ज्वेलरी, बॅग, पर्स अशा वस्तूंच्या स्टॉल्सची चांगलीच रेचलेच आहे. अमेरिकन डायमंड ज्वेलरी, अहमदाबाद ज्वेलरी, राजस्थानी ज्वेलरी अशी अनेक ज्वेलरी उत्पादने अगदी ५० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत रेशीमबाग मैदानात उपलब्ध आहेत. यासोबतच मुलतानी माती, रिठा, शिकाकाई असे नैसर्गिक सौंदर्य उत्पादने देखील येथे आहेत. सॉफ्ट टॉय, बोन्साय झाड विक्री करणारी स्टॉल्स देखील गर्दी खेचत आहे.