लोकसत्ता टीम

चंद्रपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील श्रेयवाद विकोपाला गेला आहे. दोन्ही नेते प्रत्येक कार्यक्रम स्वतंत्ररित्या दोनवेळा घेत आहेत. महाकाली यात्रेकरूंसाठी एसटी महामंडळाने पाच नवीन बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. गुरुवारी या दोन्ही नेत्यांनी या बसगाड्यांचे लोकर्पणही दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत केले. आमदार मुनगंटीवार यांनी बसस्थानकात तर, आमदार जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसरात लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रकारामुळे अधिकारी चांगलेच त्रासले आहेत.

चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी असंख्य भाविक शहरात दाखल झाले. या यात्रेवरून भाजपच्याच या दोन्ही आमदारांमध्ये श्रेयवाद आणि चढाओढ सुरू आहे. यात्रेसाठी मुनगंटीवार यांनी दोन कोटींपेक्षा अधिकचा निधी मिळवून दिला, तर जोरगेवार यांनी मंदिर परिसरात भाविकांच्या सुविधेसाठी यंत्रणा सक्रिय केली. यात्रेच्या नियोजनासाठी मुनगंटीवार, जोरगेवार यांच्यासह मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, या तिन्ही नेत्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. यापूर्वी पडोली येथील वाहतूक थांब्याचे लोकार्पणही चर्चेत राहिले. एवढेच नाही, तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांचे एकाच विश्रामगृहात या दोन्ही नेत्यांनी व त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळे स्वागत केले.

आता महाकाली यात्रेकरूंसाठीच्या नवीन बसगाड्यांचे लोकार्पणही चर्चेत आहे. पाच नवीन बसगाड्या गुरुवारी येथे दाखल झाल्या. या बसगाड्यांचे लोकार्पण मुनगंटीवार यांनी बसस्थानक येथे केले, तर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसरात बसगाड्यांचे लोकार्पण केले.

संधीसाधू ‘गोल्डन गँग’ दोन्ही आमदारांपासून दूर

मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असताना महापालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेली भाजपमधील ‘गोल्डन गँग’ सध्या दोन्ही आमदारांपासून दूर आहे. ही ‘गोल्डन गँग’ दोन्ही आमदारांच्या कार्यक्रमाला सातत्याने गैरहजर राहात आहे. काँग्रेस, भाजप व शिवसेना, अशा तिन्ही पक्षाचा प्रवास करून आलेल्या या ‘गोल्डन गँग’मध्ये माजी नगरसेवकांचा समावेश आहे. काही माजी नगरसेवक संधी साधून दोन्ही आमदारांच्या संपर्कात आहेत. मात्र, दोन्ही आमदारांनी या ‘संधीसाधू गोल्डन गँग’ला सध्यातरी दूर ठेवले आहे. भाजपच्या दोन्ही माजी महापौरही राजकारणापासून अलिप्त दिसत आहेत.