नागपूर : चद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेने भारताने आपल्या वैज्ञानिक प्रगतीचे जगाला दर्शन घडवले. भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असला तरी समाज माध्यमांवर मात्र श्रेयवादाची लढाई आणि टिंगल उडवणाऱ्या मिम्सचा पाऊस पडलाआहे. कुणी म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे ही मोहीम यशस्वी झाली. तर काही जण याचे श्रेय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देतात. त्यांनी इस्रोची स्थापना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे, असे नेहरू समर्थकांना वाटते.
हेही वाचा >>> नापास झाल्यामुळे नैराश्य; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
मोदी समर्थक पुन्हा उत्तर देताना इस्रोची स्थापना ही नेहरूंनी नाही तर वैज्ञानिक साराभाई यांनी केली हे पटवून देतात. यात राजकीय पुढारी मागे नाहीत. चांद्रयान मोहिमेवर प्रतिक्रिया देताना काहींनी मोदींचे नेतृत्वाला तर काहींनी नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला श्रेय दिले आहे. काही लोक जुने लेख टाकून इसरोचा इतिहास सांगत आहेत. चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यापासून सोशल मीडियावर याच गोष्टींची चर्चा अधिक पाहायला मिळते. याशिवाय चंद्रयान मोहीम ही अभिमानाची बाब असताना त्याची टिंगल उडवणाऱ्या मीन्सचा पाऊसही पाहायला मिळते. कुणी चंद्रावर देशी दारूचे दुकान असल्याचे बोर्ड लावलेले पोस्टर फिरवतात तर चंद्रावरील खड्डे बुजवण्यासाठी गडकरींना आवाहन करताना दिसतात. त्यामुळे आपण चंद्रावर पोहोचलो तरी सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे.