* दहन ओटय़ांची दुरवस्था  * ‘विसावा’वर श्वानांची वर्दळ  * अस्वच्छतेचा मन:स्ताप

दहन ओटय़ांची दुरवस्था, सरण रचण्यासाठी द्यावे लागणारे पैसे, ‘विसावा’वर श्वानांची वर्दळ अशा एक नव्हे तर अनेक समस्या शहरातील प्रमुख मोक्षधाम घाटावर आहेत. या सर्वाचा अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना मन:स्ताप होतो. अंत्यविधी सुरळीत पार पडावा म्हणून महापालिका करीत असलेला लाखो रुपयांचा खर्च उपयोगशून्य ठरला आहे.

शहराच्या मध्यस्थानी असलेल्या घाटांपैकी मोक्षधाम एक आहे. त्याचे व्यवस्थापन महापालिकेकडे आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांसाठी सोयी-सुविधांवर लाखो रुपये खर्च केले जाते. मात्र, येथे भेट दिल्यावर सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील कर्मचाऱ्यांच्या मक्तेदारीने येथे येणारे आणखी दुखावतात. प्रवेशद्वार तुटले आहेत. चौकीदार नसतो. त्यामुळे रात्री असामाजिक तत्त्वांचा येथे वावर असतो. आतील रस्ते उखडलेले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्याचे सिमेंटीकरण झाले होते हे येथे उल्लेखनीय. परिसर सौंदर्यीकरणाचे काम झाल्याचा दावा केला जातो. मात्र, ते कुठेही दिसून येत नाही. आतमध्ये भिकारी बसलेले असतात. अंत्ययात्रेसाठी आलेल्यांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेले बाकडे तुटले आहेत. ‘विसावा’ च्या दगडावर श्वान बसलेले असतात. त्यावर कचरा असतो. तो कधीच साफ केला जात नाही. अशीच अवस्था श्रद्धांजली सभेसाठी बांधण्यात आलेल्या ओटय़ांची आहे. सफाई कर्मचारी कामाच्या वेळेवर कधीच उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे घाटाच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबीयांनाच प्रथम स्वच्छता करून नंतर विधी पूर्ण करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली नाही. त्या ठिकाणी कचरा पडलेला असतो. तेथील नळही अनेक वेळा बंद असतो. लाकडांची व्यवस्था घाटाच्या एका कोपऱ्यावर आहे. तेथून लाकडे दहन ओटय़ापर्यंत आणण्यासाठी कर्मचारी पैसे घेत असतात. एवढेच नव्हे तर सरण रचण्यासाठीही पैसे मोजावे लागतात. घाटावर १२ दहन ओटे असून त्यापैकी निम्मे म्हणजे सहा ओटय़ांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे सरण रचनाता त्रास होतो.

लाकडे आणण्यासाठी गाडी नाही

सरणाच्या ठिकाणी लाकडे आणण्यासाठी घाटावर असलेली चारचाकी हातगाडी तुटलेली आहे. तेथे मिळणाऱ्या गोवऱ्या ओल्या असतात. लाकडेही पुरेशी दिली जात नाहीत, पैसे मात्र सात मणाचे घेतले जातात. गोरगरिबांसाठी नि:शुल्क सेवा असतानाही त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, अशा तक्रारी आहेत.

 

विद्युत दाहिनी नावाचीच

येथील विद्युत दाहिनी कधी सुरू तर कधी बंद असते. सुरू असेल तर कर्मचारी जागेवर नसतो, त्याला शोधण्यात वेळ जातो. वर्षांनुवर्षे हा प्रकार असाच सुरू आहे.

अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सर्व वस्तू आम्ही पुरवतो. अनेकदा लाकडे ओली असतात. त्यामुळे पार्थिव जळत नाही. या ठिकाणी लाकडे ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. येथे पाच कर्मचारी आहेत. कोणीही स्वत:हून पैसे मागत नाही.’’

प्रेमचंद यादव, घाटावरील कर्मचारी