चार जिल्ह्यात क्रिकेट सट्टा चालविणारी टोळी जाळ्यात अडकली असून सूत्रधार आरोपीस बुटीबोरी येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक भामटीपुरा येथील गणेश राठी हा सार्वजनिक ठिकाणी झाडाच्या ओट्यावर बसून सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली होती. आयपीएल स्पर्धेत दिल्ली विरुध्द मुंबई या सामन्यावर तो सट्टा खेळत होता. प्रत्येक बॉल आणि धावेवर तसेच विकेटवर बोली लावल्या जात होती. दहा षटकात ७० धावा शक्य असल्याचा अंदाज लावून दोन हजार रुपयाचा सट्टा लावण्यात आला होता. ही माहिती असलेला भ्रमणध्वनी संच स्थानिक शास्त्री चौकातील सलमान रज्जाक मेमन याचा असल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेतल्यावर सलमान हा बुटीबोरीलगत टाकळघाट येथे असल्याचे दिसून आले.
पोलीस चमूने तेथील लिंक बिल्डींगच्या तिसऱ्या माळ्यावर छापा टाकल्यानंतर जुगार चालू असल्याचे दिसून आले. याच छाप्यात आरोपी सलमानसह जितेंद्र तिवारी, माधव नानवाणी, मुकेश मिश्रा व रिंकेश तिवारी हे जुगार खेळताना सापडले. या ठिकाणी चौदा भ्रमणध्वनी संच, टाटा सफारी व क्रेटा या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या. रोखसह एकूण ४९ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त झाला. हे सर्व आरोपी वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ येथील ग्राहकांना जाळ्यात ओढत असल्याचे उघडकीस आले आहे.