नागपूर : क्रिकेट जगतातील ‘मिनी वल्डकप’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘चॅम्पीयन ट्रॉफी’चा पहिला सामना सुरु होताच क्रिकेट सट्टेबाज सक्रिय झाले आहेत. भारत संघाविरुद्ध होणाऱ्या प्रत्येक सामन्यावर कोट्यवधीचा सट्टा नागपुरातून लागणार असून त्यासाठी बहुतेक बुकींनी ग्रामीणमध्ये मोर्चा वळवला आहे. ग्रामीण पोलिसांनी क्रिकेट बुकींच्या अड्ड्यांवर छापे मारण्यासाठी कंबर कसली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर कोट्यवधीची सट्टेबाजीचा खेळ करणारे क्रिकेट बुकीसुद्धा नागपुरात सक्रिय झाले आहेत. अनेक मोठमोठ्या बुकींनी सर्वात मोठा बुकी ‘राज’च्या माध्यमातून शहराच्या बाहेर बस्तान बसवले आहे. सध्या राजचे काही सहकारी ग्रामीण भागातील कोंढाळी, कळमेश्वर, सावनेर, रामटेक या परिरातील काही फार्महाऊसवर डेरेदाखल झाले आहेत. लॅपटॉप आणि बुक, लाईन, आयडीच्या माध्यमातून सट्टेबाजी करण्यात येणार आहे.
गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश संघादरम्यान ‘चॅम्पीयन ट्रॉफी’तील पहिला सामना दुबईत खेळल्या जाणार आहे. बांगलादेश संघ दुबळा असल्यामुळे अनेक सट्टेबाज भारतीय संघावर सट्टा खेळणार आहेत. सध्या पोलिसांच्या खबऱ्याचे जाळे बघता शहरातील अर्धेअधिक सट्टेबाजांना ग्रामीण भागातून सट्टेबाजी खेळण्यास प्राधान्य दिले आहे. तर काही क्रिकेट बुकी लकडगंज, जरीपटका, नंदनवन, हुडकेश्वर, गिट्टीखदान, वाडी आणि हिंगणा परिसरात ठाण मांडले आहे. चॅम्पीयन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा संपेपर्यंत क्रिकेट सट्टेबाज सक्रिय राहणार आहेत. नागपुरातून कोट्यवधीचा सट्टा खेळला जाणार असून काही क्रिकेट सट्टेबाजांनी पोलीस ठाण्यातील आणि गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात छापे घातल्यास क्रिकेट बुकींचे साम्राजाला तडा जाऊ शकतो.
यादी जुन्यांची नवे बुकी मात्र मोकाट
नागपूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलाकडे आतापर्यंत छापे घालून आरोपी केलेल्या क्रिकेट बुकींची यादी आहे. मात्र, गेल्या वर्षभरात बरेच नवे बुकींनी ठाण मांडले आहे. त्यामुळे पोलीस जुने बुकींवर लक्ष ठेवून आहेत. परंतु, नव्याने दाखल झालेले बुकी मात्र मोकाट असल्याची माहिती आहे. काही बुकींनी ग्रामीण परिसरातील फार्महाऊस महिन्याभरासाठी बुक केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर ग्रामीण आणि शहर पोलीस सतर्क झाले असून क्रिकेट सट्टेबाजी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष योजना आखत आहेत.
भारताविरुद्धच्या सामन्यावर सर्वाधिक सट्टेबाजी नागपुरातील सट्टेबाज भारत विरुद्ध बांगलादेश आणि भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही सामन्यावर सर्वाधिक सट्टेबाजी करण्यासाठी सज्ज झाले आहे. पाकिस्तान विरुद्ध भारत या संघ दरम्यान होणाऱ्या सामन्यात जवळपास शंभर कोटीच्या वर सट्टेबाजीची रक्कम जाण्याचे शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.