नागपूर : १९८३ आणि २०११ मधील विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती यंदा भारतीय संघाला करणे शक्य झाले नाही. क्रिकेट चाहत्यांच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने झाली, मात्र रात्री चाहत्यांच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाचा पराभव केला आणि चाहत्यांचा हिरमोड झाला रविवारी सकाळपासूनच शहरात अंतिम सामन्याची चर्चा होती. क्रिकेट चाहत्यांमध्ये सामन्याबाबत जोरदार उत्सुकता असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा >>> नागपूरच्या अंजली,नीलिमाची दुबईत चमकदार कामगिरी, प्रौढांच्या जलतरण स्पर्धेत जिंकले…
शहरातील रेस्टॉरेंट आणि होटल्स क्रिकेटप्रेमींनी गजबजले होते. टीम इंडियाची टी-शर्ट परिधान करून चाहते जागोजागी दिसत होते. सर्वत्र केवळ क्रिकेटची चर्चा बघायला मिळाली. सोशल मिडियावर देखील अंतिम सामन्याबाबतच चर्चा होती. भारतीय फलंदाजांनी निराश केल्यावर चाहत्यांचे चेहरे पडले. मात्र आशावाद ठेवत अंतिम क्षणापर्यंत भारतीय संघाच्या पाठीशी असल्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला. मात्र भारतीय संघाने चाहत्यांना निराश केले. बारा वर्षानंतर विश्वचषक विजयाचे स्वप्न यंदा पूर्ण होऊ शकले नाही. समाजमाध्यमांवर चाहत्यांनी निराशा व्यक्त केली, मात्र भारतीय संघाच्या आणि खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहण्याचा संकल्प अनेकांनी व्यक्त केला. समाजमाध्यमांवर यावेळी पराभवाच्या कारणांची मिमांसा करण्यात चाहते गुंतले.