लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : रेल्वे विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन १७ तरुणांकडून तब्बल १ कोटी ५६ लाख रुपये हडपल्याची तक्रार अंजनगाव पोलिसांत फसवणूक झालेल्या तरुणाने केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्‍यात शिवसेना शिंदे गटाचा अंजनगाव सुर्जी शहराध्‍यक्ष योगेश उर्फ मुन्‍ना इसोकार याचा समावेश आहे.

या प्रकरणात मंगेश हेंड (३८, रा. रामटेकपुरा, अकोट) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्‍याआधारे पोलिसांनी योगेश उर्फ मुन्ना इसोकार (रा. अंजनगाव सुर्जी), श्रीकांत फुलसावंदे (रा. राजुरा ता.जि अमरावती), विलास जाधव (रा. परतवाडा) आणि मॉन्टी उर्फ मेघराजसिंह चव्हाण ठाकूर (रा. मसानगंज अमरावती) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’

मंगेश हेंड यांची डिसेंबर २०२१ मध्ये अंजनगाव सुर्जी येथील शिवसेना शिंदे गटाचा शहराध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकारसोबत ओळख झाली. त्यावेळी मुन्ना इसोकारने मंगेश यांना सांगितले की, मी शिवेसेनेतील एका माजी आमदारासोबत तुमची ओळख करुन देतो. त्याच माध्यमातून तुम्हाला रेल्वे विभागात नोकरीवर लावून देतो. त्‍यासाठी मात्र तुला पैसे खर्च करावे लागतील. तसेच दहा ते पंधरा उमेदवार लागतील. प्रत्येकाला नोकरीसाठी दहा लाख रुपये खर्च येणार असून, तो तुम्हाला करावा लागेल. इसोकारच्या या बतावणीमुळे मंगेश हेड यांनी अकोट येथील त्यांचे काही नातेवाईक व मित्र परिवारातील तरुणांना याबाबत सांगितले. त्यानंतर मंगेश हेंड यांचा मुन्ना इसोकार यांच्यासोबत व्यवहार सुरू झाला. त्यानंतर इसोकार यांच्या सांगण्यावरुन श्रीकांत फुलसावंदे यांच्यासोबत संपर्क साधून काही रक्कम त्याच्याकडे देण्यात आली. तसेच नागपुरातील एका बँकेत ‘आरटीजीएस’द्वारे रक्कम जमा केली. त्यानंतर सर्व उमेदवारांना मुंबईतील भायखळा येथील सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल येथे बोलावून उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तुमची लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत अंजनगाव सुर्जी येथे भेट घालून देणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

आणखी वाचा-१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!

रक्कम दिल्यानंतर आरोपींनी उमेदवारांना सांगितले की, तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही, आम्ही तुमची ‘ऑर्डर’ काढतो. सर्वांना आपआपल्या पत्त्यावर ‘जॉइनिंग लेटर’ मिळेल. त्यानंतर सर्व उमेदवार मुंबई येथे रूजू होण्यासाठी गेले असता तेथे अधिकारी हजर नाही, असे सांगून टाळाटाळ करून जे अधिकारी रूजू करून घेणार आहेत, ते सुद्धा सुटीवर गेले आहेत. ते सुटीवरून परत आल्यानंतर तुम्हाला रूजू करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर मुन्ना इसोकारसोबत उमेदवारांनी संपर्क केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against city president of shinde group fraud of rs 1 crore 56 lakh by lure of job mma 73 mrj