यवतमाळ : सध्या नशेखोरांच्या दुनियेत ‘एमडी’ ड्रग्ज सर्वांत प्रसिद्ध आहे. मात्र, यवतमाळसारख्या ग्रामीण भागात हे ड्रग्ज मिळत नाही. त्यामुळे आता येथील तरूण मुंबईतून या ड्रग्जच्या तस्करीत उतरले आहेत. यवतमाळातील एक तरूण मुंबईतून एमडी ड्रग्जची तस्करी करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकला. हा तरूण चक्क काजळाच्या डबीतून या अंमली पदार्थाची तस्करी करीत होता. त्यामुळे मुंबईतील ड्रग्ज माफियांच्या रडावर ग्रामीण भागातील तरूण मुले असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा >>> बेरोजगारांची फसवणूक! नोकरीचे आमिष देवून लाखो रुपये उकळले
रहीम खान कुद्दुस खान (५०) रा. मोसीन ले-आऊट, डोर्ली रोड यवतमाळ, ह. मु. गावदेव डोंगर, उस्मानीया दुध डेअरी मागे, अंधेरी वेस्ट, मुंबई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १९ ग्रॅम ७२ मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज व एक मोबाईल असा एकूण एक लाख १८ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ विकले जाणार नाहीत याबाबत काळजी घेण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी नुकतेच सर्व ठाणेदारांना दिले होते. त्यामुळे पोलिसांनी सध्या अवैध धंद्यांसह ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा >>> धान घोटाळ्यात केवळ कागदोपत्री कारवाई; भंडारा पणन अधिकारी निलंबित
अलिकडे जिल्ह्यात एमडी ड्रग्जचा (सिंथेटिक ड्रग्ज) वापर तरूण मुले नशेसाठी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. अटक केलेला तरूण मुंबईहून या अंमली पदार्थांची यवतमाळात विक्री करत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. बुधवारी हा तरूण यवतमाळात अंमली पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार रहीम खान कुद्दुस खान हा यवतमाळात पोहचताच त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडील अंमली पदार्थ जप्त केले. त्याने काजळाच्या दोन डब्यांमधून हे ड्रग्ज आणले होते. मात्र हे ड्रग्ज ५० ग्रामपेक्षा कमी असल्याने त्याला व्यवसायिक तस्करीचे स्वरूप देता येत नसल्याची तांत्रिक अडचण पोलिसांपुढे आहे. रहीमविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळात हे ड्रग्ज वापरणारे तरूण कोण आहेत, यावर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. या कारवाईवरून मुंबईतील ड्रग्ज माफियांनी आता ग्रामीण भागात आपले जाळे पसविण्यासाठी स्थानिक तरूणांना आमीष दाखवून या व्यवसायात सक्रिय केल्याचे पुढे आले आहे. यवतमाळसारख्या ग्रामीण भागात गुटखा, खर्रा यात मिसळून या ड्रग्जचे सेवन केले जाते.