लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर: अफगाणीस्तानात जीवाला धोका असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून नागपुरात राहणाऱ्या एका अफगाणिस्तानच्या नागरिकाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याची गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरु आहे. त्याचे पारपत्र बनावट असल्याचा संशय पोलिसांना आहे. उस्मान असे त्या अफगाणिस्तानच्या नागरिकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मान नावाचा अफगाणिस्तानी नागरिक काही वर्षांपूर्वी नागपुरात आला होता. त्यावेळी त्याच्या पारपत्रावर उस्मान असे नाव होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा तो भारतात आला तर त्याच्या पारपत्रावर ओस्मान असे नाव आहे. त्यामुळे त्याला गुन्हे शाखा पोलिसांनी तीन दिवसांपासून ताब्यात घेतले आणि त्याला रोज चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात येत आहे. त्याच्या साथिदारांच्या सांगण्यावरून उस्मान या निरीक्षर आहे. त्यामुळे त्याच्या पारपत्रावर टंकलेखनाची चूक झाली आहे.
मात्र, पोलिसांना त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उस्मानकडे ‘तजकिरा’ नावाचे अफगाणिस्तानचे ओळखपत्र आहे. त्याला पुन्हा अफगाणिस्तानात परत पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.