यवतमाळ : आयपीएल क्रिकेटचा १८ वा सिझन धडाक्यात सुरू आहे. या क्रिकेटमध्ये अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न बाळगून गल्ली, बोळात आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळला जात आहे. असाच प्रकार यवतमाळ येथे सुरू असताना ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सट्टा लावण्याच्या उपयोगातील साहित्य तसेच रोख असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोहारा एमआयडीसी परिसरातील एका खासगी घरात करण्यात आलेल्या या कारवाईत  साहिल शेख मुबारक शेख (३०, रा. इंदिरा नगर), अभिजित रमाकांत तांबेकर (४९, रा. काळे ले आऊट, देवराव पाटील शाळेजवळ वडगाव), या दोन आरोपींची अटक करण्यात आली आहे. शहरातील लोहारा परिसरातील गोकूळ हेरिटेज इमारतीत दोन व्यक्ती आयपीएल क्रिकेटच्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यावेळी साहिल शेख मुबारक शेख आणि अभिजित रमाकांत तांबेकर दोघेही मोबाईलवरून सीएसके आणि दिल्ली संघाच्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेताना रंगेहात सापडले. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सट्टा लावण्याचे साहित्य आणि रोख, असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन राजमल्लू, सैय्यद साजिद, बंडू डांगे, रूपेश पाली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, आकाश सूर्यवंशी, देवेंद्र होले, योगेश टेकाम यांनी पार पाडली.

यवतमाळ जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात पांढरकवडा तालुक्यात सट्टाबाजार खेळला जातो. पाटणबोरी हे आंतरराज्य सट्टा केंद्र झाले आहे. आता आयपीएल सीझनमुळे जिल्ह्यातील प्रत्येक शहरात, गल्लीबोळात ऑनलाईन सट्टा खेळला जात आहे.

असंख्य तरूण ऑनलाईन सट्टा खेळत आहेत. मात्र, कारवाई क्वचित प्रकरणात होते. यवतमाळातील क्रिकेट सट्ट्याची पाळेमुळे थेट दुबई, गोवापर्यंत असून बुकी तेथे बसून ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यात सर्वसामान्यांना उध्वस्त करत असल्याची चर्चा शहरात आहे.