अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात गुन्ह्यांचा आलेख उतरता आहे. गेल्या तीन महिन्यांचा आढावा घेतला असता २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये २८ टक्के गुन्हे घटले आहेत. रेल्वे पोलिसांची सतर्कता आणि प्रवाशांमध्ये जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवासासाठी सर्वात सुरक्षित व स्वस्त माध्यम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितल्या जाते. रेल्वेमधून दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. मध्य रेल्वेचा सर्वात व्यस्त व चांगला महसूल देणारा म्हणून भुसावळ विभागाची ओळख आहे. भुसावळ विभागांतर्गत अकोला, बडनेरा, भुसावळ, जळगाव आदींसह अनेक महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. अनेक वेळा रेल्वेतील प्रवाशांना गुन्हेगारांकडून लक्ष्य करण्यात येते. मध्यंतरी भुसावळ विभागात गुन्हेगारांचे प्रमाण देखील वाढले होते. चोऱ्या, अवैध धंदे आदींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे पोलिसांनी सतर्क राहत प्रवाशांमध्ये राबविलेल्या जनजागृतीमुळे गुन्ह्यात घट झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी गाड्यांमधील गस्त वाढवली आहे. विभागातील अनेक अट्टल गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. प्रवासात सतर्क राहण्यासंदर्भात प्रवाशांना माहिती देऊन गुन्हे कमी होण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यावर दिसून येत आहे.

हेही वाचा >>>भंडारा: गोसेखुर्द धरणाची सर्व ३३ दारे उघडली ; आज ऑरेंज अलर्ट

एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये २०२२ वर्षांत एकूण १४८ गुन्हे घडले होते. या २०२३ वर्षात त्याच तीन महिन्यांमध्ये ४२ गुन्ह्यांमध्ये घट झाली असून यावर्षी १०६ गुन्हे भुसावळ विभागात घडले आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान रेल्वे मालमत्ताच्या नुकसानीचे २०२२ मध्ये ९७, तर २०२३ मध्ये ८४, रेल्वेत दरोडा टाकण्याचे २०२२ मध्ये एक, तर २०२३ मध्ये दोन, चोरीचे २०२२ मध्ये ३२ व २०२३ मध्ये १४ आणि महिलांविरूद्ध गुन्ह्यांमध्ये २०२२ मध्ये १८, तर २०२३ मध्ये सहा गुन्ह्यांची नोंद झाली. एकूणच सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा विचार केल्यास २८ टक्के गुन्हे कमी झाले आहेत. भुसावळ विभागातील गुन्ह्यांच्या दरात लक्षणीय घट झाल्याने प्रवाशांचा सुखरूप व सुरक्षित प्रवास होत आहे.

हेही वाचा >>>राष्ट्रवादीच्या नेत्यांना विधान परिषद आमदारकीचे वेध; गोंदिया-भंडारातील इच्छुक सक्रिय

गुन्हेगारी कमी करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सतर्क राहून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला. त्याचे परिणाम स्वरूप विभागात गुन्हेगारीत घट झाली.- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ विभाग, मध्य रेल्वे.

गुन्हे घडू नये म्हणून प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. अट्टल गुन्हेगारांची धरपकड केली. प्रवाशांना देखील जागृत केले जात आहे.- युनूस खान, पोलीस निरीक्षक, आरपीएफ, अकोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime graph in bhusawal section of central railway goes down ppd 88 amy
Show comments