सात लाखांचा ऐवज उडवला
दिवाळी आटोपताच शहरात पुन्हा चोरटय़ांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. प्रतापनगरातील रवींद्रनगरात (परसोडी) राहणाऱ्या एका कंत्राटदाराच्या घरातून चोरटय़ाने रोकड आणि दागिणे असा मिळून साडेचार लाखांचा तर सीताबर्डीतील एका कपडय़ाच्या दुकानातून दागिने आणि रोकड असा २ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज उडवला. आज सोमवारी गुन्हा दाखल झाल्यावर दोन्ही घटना उघकीस आल्या. चोरीच्या या घटनांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
पहिली घटना प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मनीष विजय शहा (वय ५०) हे परसोडीत राहतात. ते बांधकाम कंत्राटदार आहेत. ते ९ नोव्हेंबरला सायंकाळी कुटुंबासह कोल्हापूरला गेले होते. रविवारी घरी परतल्यावर त्यांना दाराचे कुलूप तुटलेले आढळले. पोलिसांच्या प्राथमिकचौकशीत चोरटय़ाने आधी ग्रीलच्या गेटचे आणि नंतर दाराचे सेंट्रल लॉक तोडून शहा यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर शयनकक्षातील लाकडी कपाटात ठेवलेली ४ लाख ५४ हजार ६०० रुपयांची रोकड आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. शहा यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचारी आणि मजुरांचा पगार देण्यासाठी १२ लाखांची रोकड घरी आणून ठेवली होती. एका प्लास्टिकच्या पिशवीत ही रोकड आणि सोन्याची अंगठी ठेवून त्यांनी ही पिशवी कपाटात ठेवली. त्यातील ४.५४ लाखांचा मुद्देमाल चोरटय़ाने उडवला.
उर्वरित रक्कम पिशवीत तशीच असल्याने ही चोरी संपर्कातील व्यक्तीनेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. दुसरी घटना सीताबर्डी परिसरातील राजघराणा या कापडाच्या दुकानात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, सतरंजीपुरा इतवारीत राहणारे संकेत मुकेश जैन यांचे हे दुकान आहे. त्यांच्या दुकानामागच्या स्वच्छतागृहाची ग्रील तोडून रविवारी पहाटे २.५८ च्या सुमारास चोरटे आतमध्ये शिरले. त्यानंतर काऊंटरमध्ये ठेवलेली २ लाख, १६ हजार ३५० रुपयांची रोकड आणि चांदीची मूर्ती घेऊन चोरटे पळाले. रविवारी दुपारी जैन यांनी या चोरीची तक्रार सीताबर्डी पोलिसांकडे नोंदवली.