सुफी फंडमध्ये गुंतवणुकीवर जास्त व्याज परताव्याचे आमिष दाखवून शहरातील ३४२ लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका दांम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या दाम्पत्याने ६० लाखांनी फसवणूक केल्याचे सांगितले जात असले तरी फसवणुकीची रक्कम कोट्यवधीत असल्याची माहिती समोर येत आहे.

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. जितेंद्रनाथ ऊर्फ जितू लल्लुराम गुप्ता (४४, अशोकनगर, सिद्धी कॉलनी) व त्याची पत्नी अंजू (३८) अशी आरोपींची नावे आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी नागरिकांना फंडच्या जाळ्यात अडकवायची योजना आखली. त्यांनी सुफी फंड या नावाने गुंतवणूक योजना तयार केली. यात दैनंदिन तसेच इतर गुंतवणुकीचे पर्याय होते. अगोदर पाचपावलीतील अशोकनगरातील गोंड मोहल्ल्यात कार्यालय थाटले.

हेही वाचा: नागपूर: समृद्धीची पाहणी, मेट्रोची सफर, ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा आणि अन्य काही…. कुठे कुठे जाणार पंतप्रधान?

शहरातील विविध भागातील नागरिकांशी संपर्क साधला व बँकांपेक्षा जास्त व्याजदर मिळेल, असे आमिष दाखवले. दाम्पत्याने विविध माध्यमांतून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले व ३४२ लोकांकडून ६० लाख ६७ हजार रुपये गोळा केले. मात्र, रकमेचा परतावा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विविध कारणे सांगण्यास सुरुवात केली. गुंतवणूकदारांनी काही काळ संयम राखला. त्यानंतर मात्र महेश लोटनप्रसाद गुप्ता (५१) यांनी पोलिसात तक्रार केली. पाचपावली ठाण्यातील पथकाने प्राथमिक चौकशी करून गुप्ता दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व जितू गुप्ताला अटक केली.

Story img Loader