वर्धा: तब्बल एक वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर पळून आलेल्या एका विधवेची ही थरारक कथा. तिने हिंगणघाट पोलीसांकडे धाव घेत झालेला अत्याचार कथन केला. शहरातील रहिवासी असलेल्या पिडीत महिलेच्या पतीचे चार वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर ती धुणीभांडी करीत उदरनिर्वाह करीत होती. छाया नामक ओळखीच्या महिलेच्या घरी तिची मंगलासोबत भेट झाली. तिने राजस्थानात घरकाम करणाऱ्या महिलेची गरज असल्याचे सांगून चांगला मोबदला मिळण्याचे आमिष दाखविले.
पीडिता मंगला व पुनम या दोघी सोबत प्रथम रतलाम या गावी पोहचली. तिथे एका स्टॅम्प पेपर वर तिची सही घेण्यात आली. काही दिवसांनी त्या गावी शंकर राठोड व दिलीप राठोड हे पोहचले. त्यांनी पीडित महिलेकडून आधारकार्ड व मोबाईल काढून घेतला. शंकरने दोन लाख रुपयांत तिची विक्री केली. त्याने त्याचा मुलगा दिलीपची पत्नी असल्याचे सांगणे सुरू केले. याच ठिकाणी तिच्यावर अत्याचार करणे सुरू झाले.
मारहाण पण होत होती. तब्बल एक वर्ष हा प्रकार सहन केल्यानंतर सदर महिलेने तिच्या आईची तब्येत बिघडली, असे सांगून परत येण्याची खात्री देत सुटका करून घेतली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंगला, पुनम, शंकर व दिलीप राठोड तसेच आनंद विरोधात गुन्हे दाखल केले आहे.