प्रतिनिधी, नागपूर
एका लुटपाटीच्या गुन्ह्य़ाचा तपास करताना सीताबर्डी पोलिसांनी २४ तासांमध्ये दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर पाच दिवसांत न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे तपासून निकाल देत आरोपीला दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
नीलेश दिलीपराव पोटफोडे (२७) रा. वरूड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे. गेल्या १८ ऑक्टोबरला नरखेड तालुक्यातील बेलोना येथील दालचंद हेमराज गजभिये (४२) हे दीक्षाभूमी येथे जाण्यासाठी रेल्वेने नागपुरात आले. दुपारी ते पायी जात होते. टेकडी गणेश मंदिरासमोर नीलेश याने त्यांना अडवले. शिवीगाळ करून त्यांच्या खिशातील रोख व मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. दालचंद यांनी विरोध केला. नीलेश याने दगडाने त्यांचे डोके फोडले व मोबाईल हिसकावला. लूटपाट झाल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.बी.दानडे, डी.एस. राऊत, बांते, पंकज व अमोल घटनास्थळी पोहोचले. नीलेश याला अटक केली. दानडे यांनी घटनेच्या २४ तासांत प्रकरणाचा तपास करून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी बी.जी. तारे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. २० व २१ ऑक्टोबरला न्यायालयाला सुटी होती. २२ व २३ ऑक्टोबरला याप्रकरणाचा खटला न्यायालयात चालवण्यात आला. सर्व साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने आरोपीला दोषी धरून दोन वर्षे कारवास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे राजेंद्र श्यामसुंदर व साधना बोरकर यांनी काम पाहिले.