फाशीची शिक्षा झालेल्या सात कैद्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. जानेवारी २०१८मध्ये ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. सध्या ते दुसऱ्या सत्राला आहेत.

२०१० पासून इग्नूने  कैद्यांसाठी अभ्यासक्रम सुरू केला. आतापर्यंत अनेक कैद्यांनी इग्नूच्या माध्यमातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात एमबीएसाठी नऊ कैद्यांनी प्रवेश घेतला. त्यातील सात कैद्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या या कैद्यांनी शिक्षण घेण्याचा मानस कायम ठेवला असून त्यासाठी ते विशेष मेहनत घेत आहेत. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ असे ब्रिद असलेल्या इग्नूच्यावतीने अनुसूचित जाती, जमाती, वारांगणा, तृतीयपंथी यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रादेशिक समन्वयक डॉ. पी. शिवस्वरूप विशेष प्रयत्न करीत आहेत. जानेवारी २०१९च्या सत्रासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१८ आहे. प्रवेश परीक्षा १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे.

मेननही इग्नूचा विद्यार्थी होता

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेननही इग्नूचा विद्यार्थी होता. येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने इग्नूच्या माध्यमातून इंग्रजी आणि राज्यशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. एम.ए. इंग्रजीचा तो सुवर्णपदक विजेता विद्यार्थी होता.

मध्यवर्ती कारागृहातील  नऊ कैद्यांनी जानेवारी २०१८मध्ये प्रवेश घेतला असून त्यातील सात जणांना फाशीची शिक्षा झाली आहे. सध्या हे कैदी एमबीएच्या दुसऱ्या सत्रात शिकत आहेत. त्यांचा भूतकाळ विचारात न घेता त्यांच्यात शिकण्याची उर्मी कायम आहे, हे फारच महत्त्वाचे आहे.    – डॉ. पी. शिवस्वरूप, समन्वयक, इग्नू