नागपूर : नैऋत्य मोसमी पाऊस राज्यातून जवळजवळ परतला असताना अवकाळी पावसाचे संकट राज्यावर घोंगावत आहे. एकीकडे परतीचा पाऊस, दुसरीकडे “ऑक्टोबर हिट”चा तडाखा आणि आता अवकाळी पावसाचे नवे संकट राज्यावर आहे.

यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरीही म्हणावी तशा थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. रात्रीपासून तर पहाटेपर्यंत बाहेर वातावरणात गारवा जाणवतो. मात्र, दिवसभर उकाडादेखील तेवढाच त्रस्त करतो. राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आणि विदर्भातूनही नैऋत्य मोसमी पावसानं पूर्णपणे माघार घेतली आहे. राज्यातून जवळजवळ पूर्णपणे परतीचा पाऊस परतला आहे, पण अशातच आता अवकाळी पाऊस राज्यात सुरु झाला आहे.

हे ही वाचा…गुन्हा नसताना १९ दिवस कारागृहात डांबले, ४३ वर्षे जुनी फाईल बंद करण्याच्या नादात पोलिसांनी…

भारतीय हवामान खाते आणि हवामान अभ्यासकांकडून राज्यात सध्या पडत असलेला पाऊस मान्सून नसून अवकाळी असल्याचे सांगितले आहे. मागील वर्षी राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जवळजवळ वर्षभर अवकाळी पावसाने राज्यात ठाण मांडले होते. आताही अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे वर्षभर तर तो कायम राहणार नाही ना, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. येत्या २४ तासात अवकाळी पावसाचे संकट राज्यावर कायम असणार आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात देखील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी असून तापमानावर याचे परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जेव्हा की १५ ऑक्टोबरलाच नैऋत्य मोसमी पावसाने विदर्भातून पूर्णपणे माघार घेतल्याची घोषणा प्रादेशिक हवामान खात्याने केली होती.

हे ही वाचा…भंडारा : चरण वाघमारेंच्या ‘एन्ट्री’मुळे काँग्रेस-पवार गटाचे नेते आक्रमक; सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो आता किनारपट्टी भागाकडे पुढे सरकत आहे. चेन्नई आणि पुदुचेरीपासून ३०० ते ३५० किलोमीटर दूर असल्याचे सांगितले जात आहे. येत्या काळात कमी दाबाचे हे क्षेत्र नेल्लोर आणि पुदुच्चेरी जवळ किनाऱ्यावर धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील मोसमी पावसाने उघडीप दिली असली तरीही अवकाळी पाऊस मात्र आता अडचणी वाढवताना दिसून येत आहे. एकिकडे दक्षिण-पश्चिम मान्सूनने आता माघार घेतल्यानंतर आता उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य मान्सूनने दक्षिणेकडील राज्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुंबई शहर, उपनगरासह कोकणात मध्यम पावसाची शक्यता आहे. १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आता हा अवकाळीचा तडाखा राज्यावर नवे संकट तर घेऊन येणार नाही ना, अशीही भीती आहे.