शफी पठाण, लोकसत्ता
नागपूर: येथे एक परिसंवाद झाला. ‘उदगीर साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण : चिंतन आणि विश्लेषण’ असे या परिसंवादाचे गोंडस शीर्षक. ‘साहित्य समादाय भव’ वैगरे अशा उदात्त हेतूने या परिसंवादाचे आयोजन केले असून तो एक निखळ वाड:मयीन उपक्रम आहे, असे भासवण्याचा आयोजकांनी प्रयत्न केला. परंतु आयोजक संस्था, तिला सहकार्य करणाऱ्या उपसंस्था, ‘परिश्रमपूर्वक’ निवडलेले वक्ते व त्यांच्या भाषणातून व्यक्त झालेले ‘बंच ऑफ थॉट्स’, यातून या कार्यक्रमाच्या आयोजनाचा शुद्ध राजकीय हेतू काही लपून राहू शकला नाही.
सासणेंच्या अध्यक्षीय भाषणावर चिंतनाच्या ठिकाणी चिंता व विश्लेषणाच्या ठिकाणी विखार हीच या परिसंवादाची प्रमुख वैशिष्टये ठरली. ती काही अगदीच अनपेक्षित नव्हती. २०१४ च्या ‘नव्या स्वातंत्र्या’नंतर जसा देशभरातील राजकारणाचा ‘अभ्यासक्रम’ बदलला तसाच तो अर्थ, साहित्य, संस्कृती आणि इतिहासाचाही बदलला. सासणेंच्या भाषणावरील या परिसंवादातही या बदलाची प्रचिती श्रोत्यांना पदोपदी आली आणि भाषणागणिक या परिसंवादामागील आयोजकांची राजकीय निकडही उलगडत गेली. संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा इतिहास चाळला तर काही मोजके सन्मानजनक अपवाद वगळता साहित्याच्या परिघाबाहेर भाष्य करण्याचे धाडस फारसे कुणी केले नाही. पण, मागच्या काही वर्षांत हे चित्र बदलले. संमेलनाध्यक्ष श्रेयस प्रेयसाच्या वलयाबाहेर जाऊन वर्तमान व्यवस्थेवर कठोर प्रहार करू लागले. श्रीपाल सबनीस हे या प्रहार सत्राचे आद्य प्रवर्तक. पिंपरी-चिंचवड येथे २०१५ साली आयोजित संमेलनात त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आणि मोठेच वादळ उठले. बडोद्यात लक्ष्मीकांत देशमुख यांनीही राजा, तू चूकतोयस..अशा शब्दांत राजकीय नेतृत्वाला खडसावले. पुढे उस्मानाबादेत फादर दिब्रिटो यांनीही निर्दोषांची डोकी फुटत असताना आम्ही गप्प कसे बसणार, असा खडा सवाल विचारला. सासणेंनी तर कहरच केला. काळ मोठा कठीण आलाय, असे सांगून त्यांनी विदूषकाहाती सत्ता गेल्याचेही खडेबोल सुनावून टाकले.
एरवी निरुपद्रवी म्हणून गणले जाणारे हे संमेलनाध्यक्ष आपले राजकीय नुकसान करू शकतात, ही बाब लक्षात आल्यावर जणू सरकारचे स्लीपर सेल खडबडून जागे झाले. सासणेंच्या भाषणाचा प्रतिवाद हे त्याच ‘जागृती’चे लक्षण. यासाठी नागपुरात पुढाकार घेतला तो अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांत भारतीय विचार मंच आणि महालातील राष्टीय वाचनालयाने. या सर्व संस्थांचे वैचारिक अधिष्ठान म्हणजे संघ. म्हणून मग वक्तेही संघ विचाराचेच निवडण्यात आले. तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या परिसंवादात पहिले भाषण केले प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी. साहित्याच्या व्यासपीठावर सासणेंनी राजकीय भाषण केले, असा त्यांचा आरोप. पण, हा आरोप करताना साहित्यिकही समाजाच घटक असतो व समाजाच्या चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब त्याच्या रोजच्या जगण्यावरही उमटत असतात, हे नाईकवाडे सोयिस्कररीत्या विसरले. यानंतरचे वक्ते होते डॉ. कोमल ठाकरे. त्यांची तर मोठीच वैचारिक पंचाईत झाली. आपल्या प्रतिमा संवर्धनात उजव्यांपेक्षा डाव्यांचे श्रेय जास्त. मग, सासणेंना शिव्याशाप देऊन आपल्या मूळ आश्रयदात्यांची नाराजी आपल्याला परवडेल का, हा त्यांच्यासमोरचा प्रश्न. त्यामुळे त्यांनी भाषणात संतुलन साधण्याचा अपयशी प्रयत्न केला. तिसरे वक्ते पत्रकार डॉ. अनंत कोळमकर . त्यांच्या वैचारिक दैवताला सासणेंनी विदूषक म्हटले हे त्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी आपल्या भाषणातून याचा समाचार तर घेतलाच पण, ज्यांना सासणे विदूषक म्हणताहेत ते दोनदा बहुमताने सत्तेत आले, याचे त्यांनी स्मरणही करून दिले. या परिसंवादाचे अध्यक्ष सुधीर पाठक यांनी संमेलनध्यक्षाच्या आणीबाणी विरोधाचे कौतुक केले. मात्र त्याच वेळी वर्तमानातील अघोषित आणीबाणी विरोधात बोलणाऱ्या सासणेंची मात्र निंदा केली.