पुणे विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवून आस्थेने विचारपूस केल्याने राष्ट्रवादीच्या एका गटात पोटदुखी सुरू झाली. त्यामुळे ते आंदोलन करीत आहे, अशी टीका भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

देहू येथील कार्यक्रमात मोदी यांनी पवार यांना भाषणासाठी आमंत्रित केले होते, हे सर्व महाराष्ट्राने बघितले. त्यामुळे पवार यांचा अपमान झाला, असा आरोप करणे अयोग्य आहे. भाषण करण्याबाबत खुद्द मोदी यांनी केलेल्या विनंतीला पवार यांनी विनम्रपणे नकार देऊन मनाचा मोठेपणा दाखवला आणि मोदींना भाषणाची विनंती केली.

हे दृश्य संपूर्ण देशातील जनता बघत होती. यातून मोदी आणि पवार यांच्यातील मोठेपणा सर्वांनी अनुभवला. या प्रसंगातून आपला अपमान झाला, अशी भावना पवार यांच्या मनात निर्माण देखील झाली नसेल. परंतु राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना पोटदुखी होत आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

Story img Loader