लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडचिरोली : पावसाळी अधिवेशनादरम्यान गडचिरोली-चामोर्शी मार्गावर अर्धवट छप्पर उडालेल्या अवस्थेत धावणाऱ्या बसची चित्रफीत सार्वत्रिक झाल्याने सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली होती.

आत पुन्हा अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली असून यात पाऊस सुरू असताना चालक एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात बसचे ‘स्टिअरिंग’ घेत जीवघेणा प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. ही चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ‘लालपरी’ ही ‘जलपरी’ झाल्याची खोचक टीका केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यात दक्षिण भागात तर खराब रस्त्यांमुळे नागरिकांना बसने प्रवास नकोसा झाला आहे. गाड्यांची अवस्था बघता तात्काळ सुधारणेची गरज आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना लालपरितून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी अर्धवट छप्पर उडालेल्या अवस्थेत धावणाऱ्या बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली होती.

आणखी वाचा-मुंबई – हावडा (व्हाया नागपूर) मार्गावर रेल्वेचा वेग वाढणार! १३० किलोमीटर प्रती तास गतीने धावली..

त्याप्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा एक चित्रफीत सार्वत्रिक झाली असून यात चालक एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात बसचे ‘स्टिअरिंग’ घेत जीवघेणा प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ‘राज्यभरात सामान्य प्रवाशाची ‘लालपरी’ सरकारच्या दुर्लक्षामुळे ‘जलपरी’ झालीय. हे ‘सामान्यांचं सरकार’ आहे असं भासवणाऱ्या सरकारला मात्र सामान्य माणसांविषयी काहीही देणंघेणं नसल्याचंच यातून सिद्ध होतं.

आता मविआ आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना ही गळणारी बस दिसेल काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याविषयी अहेरी आगाराच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism of rohit pawar over viral video in gadchiroli umbrella in one hand and steering of bus ssp 89 mrj