अकोला: प्रधानमंत्री पीक विमा खरीप योजनेत शासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीला दिले आहेत. कंपनीकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत सर्व ५२ महसूल मंडळातील दोन लक्ष ११ हजार ९६८ शेतकऱ्यांना दोन लाख १६ हजार २३२ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १२२ कोटींची नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
आमदार रणधीर सावरकर यांनी पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या निर्देशात आणून दिला. त्यावर पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिले आहेत. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे आदी उपस्थित होते.
हेही वाचा… राज्यासह देशातील वातावरणात मोठे बदल; ऐन हिवाळ्यात थंडीसह ऊन आणि पाऊसही
अकोला जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड व सरासरीच्या कमी पाऊस झाला असल्याने तालुकास्तरीय संयुक्त समितीमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये घट दिसून आली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत २५ टक्के विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत अधिसूचना ६ सप्टेंबर रोजी लागू केली.
एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. त्या आक्षेपाची पूर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यातील दोन लक्ष ११ हजार ९६८ शेतकऱ्यांनी दोन लक्ष १६ हजार २३२ हे. क्षेत्रावर पीक विमा काढलेला असून जवळपास ९५ टक्के सोयाबीन क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे.