यवतमाळ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी १० लाख रुपयांचा अग्रीम पीक विमा जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा मिळाल्याने या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यास मदत झाली आहे.
राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम रक्कम अदा करण्यास रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने मंजुरी दिली. पीक विमा नुकसान भरपाई रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे.
हेही वाचा – पुणे : शुभेच्छा दिवाळीच्या, लक्ष्य लोकसभेचे! माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची फलकबाजी
ऐन दिवाळीत ही अग्रीम रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या पूर्वसुचनांची नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही विमा कंपनीच्या स्तरावरून सुरू असून उर्वरित शेतकऱ्यांनादेखील लवकरच विमा कंपनीमार्फत लाभाचे वितरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
हेही वाचा – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी व्यवस्थापन, एनआरआय कोट्याचे कमाल शुल्क जाहीर
अतिवृष्टीने नुकसान
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ९८९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांच्या आठ लाख ४४ हजार ७५७ अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी एकूण पाच लाख २५ हजार ५४१ पीक विमा योजनेच्या स्थानिक आपत्ती जोखीमेअंतर्गत पूर्वसुचना नोंदविल्या आहेत. या प्राप्त पूर्वसुचनांचे पंचनामे करून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या पीक विमा अंमलबजावणी कंपनीमार्फत जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांना ४१ कोटी १० लाख रुपये रकमेची विमा भरपाई रक्कम ८ व ९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.