प्रमोद खडसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात ७१० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी आणि महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. याचबरोबर त्यांनी सत्तारूढ आमदार, खासदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचीही सूचना केली. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेच नाही. या नेत्यांनी बळीराजाला वाऱ्यावर सोडले की काय, अशी शंका शेतकरी वर्गातूनच उपस्थित होत आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पपई, टरबूज, खरबूज, लिंबू, बिजवाई कांदा, हळद तसेच रब्बी हंगामातील काढणी राहिलेला गहू, हरभरा यासह पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले. वज्राघातामुळे जनावरांचा बळी गेला, तर अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाच्यावतीने पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहे. आतापर्यत ७१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलीक यांच्यासह इतर कुठलेच लोकप्रतिनिधी अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्याचे दिसून आले नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना आणि सत्तारूढ खासदार, आमदरांना दिलेल्या सूचना अद्याप तरी हवेतच विरल्या आहेत. पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधी बांधावर कधी येणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

हेही वाचा >>>नागपूर : महाराष्ट्रदिनाचा निषेध म्हणून उमरेड परिसरातून देशभरात जाणारा कोळसा रोखणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा

हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगातात. मात्र, कोणतेही सरकार असो शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ते दुर्लक्षच करते, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांना दिलासा देण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनीच त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आमचे अश्रू कोण पुसणार, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crop loss in more than 710 hectares in the district due to unseasonal rain and hailstorm pbk 85 amy
Show comments