बुलढाणा: बुधवारी (दि.२६) संध्याकाळी झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस व वादळाने तब्बल १३२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच पाच जनावरांचा मृत्यू झाला.आज, गुरुवारी संध्याकाळी कृषी विभागाने जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. बाधित ६ तालुक्यामधील ५७ गावांना निसर्गाच्या तांडवाचा तडाखा बसला आहे. खामगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९३६.६० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. ३० गावांना झळ बसली आहे. याशिवाय चिखली तालुक्यातील ८ गावांतील ९१.८० हेक्टर, मोताळा १० गावातील २९७. ८० हेक्टरवर पिके जमीनदोस्त झाली. मलकापूर, नांदुरा, शेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका गावाला फटका बसला. यामुळे उन्हाळी भुईमूग, ज्वारी, मका, कांदा, भाजीपाला, टरबूज, खरबूज आणि भाजीपाल्याची नासाडी झाली आहे.
झाडाखाली दबून मृत्यू
दरम्यान, वादळाचा प्रचंड तडाखा बसलेल्या मोताळा तालुक्यातील ४ जनावरांचा वादळामुळे उन्मळून पडलेल्या झाडांखाली दबून मृत्यू झाला. सिंदखेडराजा तालुक्यात वीज पडून बैल ठार झाला.