नागपूर : अवयव दान जनजागृतीवर सरकारकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. परंतु राज्यातील एकाही शासकीय रुग्णालयांत यकृत प्रत्यारोपण होत नाही. मात्र आता नागपुरातील एम्स रुग्णालयात प्रस्तावित यकृत प्रत्यारोपण केंद्राची नुकतीच आरोग्य विभागाच्या चमूने पाहणी केली. त्याला लवकरच मंजुरी मिळणार असल्याने हे मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिमद्यपान, ‘हिपॅटायटीस बी’ व ‘सी’, अनियंत्रित मधुमेह, रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल व ‘फॅटी लिव्हर’मुळेही यकृत निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. नागपुरात सध्या २०९ रुग्ण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत. यकृत प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी एम्स प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यानुसार केंद्राला प्रस्ताव दिल्यावर आरोग्य विभागाच्या चमूकडून एम्सच्या केंद्राची पाहणी करण्यात आली.

होही वाचा…काँग्रेसचे नेते करत काहीच नाही; केवळ…

u

पाहणी समिती सकारात्मक असल्याची माहिती असून लवकरच एम्समधील यकृत प्रत्यारोपण केंद्राला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या केवळ मुंबई महापालिकेच्या के. ई. एम. येथेच यकृत प्रत्यारोपण केंद्र मंजूर आहे. दरम्यान नागपुरातील एम्स या शासकीय रुग्णालयात हे केंद्र उपलब्ध झाल्यास गरजूंना अल्प दरात यकृत प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध होईल. सध्या खासगी रुग्णालयातील या प्रत्यारोपणाचा खर्च गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांच्या आवाक्यात नाही, हे विशेष.

सुपरस्पेशालीटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तिढा?

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण केंद्र प्रस्तावित आहे. त्यानुसार येथे शल्यक्रिया गृह व अतिदक्षता विभाग तयार झाला आहे. परंतु विशेषज्ञ शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्याने आवश्यक यंत्र खरेदीचा प्रश्न कायम आहे. तज्ज्ञ मिळाल्यास सुपरस्पेशालिटीमध्ये दुसरे केंद्र सुरू होईल. “यकृत प्रत्यारोपण केंद्राला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. हे राज्यातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र असेल. त्यामुळे गरिबांना कमी दरात यकृत प्रत्यारोपण शक्य होईल.” डॉ. संजय कोलते, अध्यक्ष, विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती, नागपूर.

अवयव प्रत्यारोपणाची संख्या वाढली

नागपुरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातही प्रत्यारोपणाची संख्या वाढली आहे. मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जवळपास ६५च्यावर मुत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे. तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) ३५वर मुत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे.

होही वाचा…बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…

प्रत्यारोपण समितीमुळे अवयव प्रत्यारोपणाला वेग

कुणाचे अवयव अचानक निकामी होऊन त्यांना वेळीच अवयव मिळाले नाही तर त्यांची आयुष्ययात्रा थांबते. कुण्या दात्याचे अवयव प्राप्त झाले, त्याचे प्रत्यारोपण झाले तर त्याला नवे जीवन मिळू शकते. नागपूरच्या झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटरमुळे अवयवदान चळवळीला वेग आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crores spent by government on organ donation awareness but no liver transplant is done in any government hospital in the state mnb 82 sud 02