चंद्रपूर : विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारानी क्रॉस मतदान केल्याचा विषय पक्षाने गंभीरतेने घेतला आहे. क्रॉस मतदान करणाऱ्या सर्वांची नावे कळली आहेत. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, असा इशारा माजी पालकमंत्री तथा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला.
चंद्रपूर विश्रामगृह येथे पत्रपरिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी त्यांनी अडीच वर्ष पालकमंत्री म्हणून केलेल्या कामाची माहिती दिली. शिंदे सरकारने विकास कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य नाही. ब्रम्हपुरी रेडिमेड ग्रारमेंटचे काम सुरू केले, ३ हजार महिलांना काम दिले. सावली येथे १३ कोटी रुपयांचे क्लस्टरचे काम सुरू केले. लोकांना रोजगार मिळावा, बंद उद्योग सुरू व्हावे या दृष्टीने काम केले.
विदेशात शिक्षणासाठी १० ओबीसी मुलांची शिष्यवृत्तीची संख्या वाढवून १०० करण्याचा निर्णय घेतला. बांठीया समितीने ३७ टक्के ओबीसी संख्या असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे आरक्षणावर दूरगामी परिणाम होणार आहे. आडनावावरून जात ठरविणे अयोग्य आहे. २३५ जातींवरून ३८२ जाती ओबीसीमध्ये आहेत. संख्या वाढायला पाहिजे. ३७ टक्के आरक्षणावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत. ते ओबीसींना संपविण्यासाठी निघाले आहेत. राजकीय आरक्षण मिळेल. पण नोकरी व शिक्षण नसल्याने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होईल. हा आत्मघाती निर्णय आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.