नागपूर : रामदासपेठेतील एका हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर मुंबईचा एक निवृत्त अधिकारी थांबला होता. या अधिकाऱ्याच्या भेटीसाठी पूर्व विदर्भातील विविध जिल्ह्यांतील आरटीओच्या अधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने विविध चर्चेला पेव फुटले होते. आवडीच्या ठिकाणी बदलीसाठीचा हा खेळ असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.
उपराजधानीतील परिवहन खात्यांच्या विविध व्हाॅट्सॲप समुहांवर बुधवारी अचानक पूर्व विदर्भातील काही अधिकाऱ्यांच्या नावाच्या याद्या फिरू लागल्या. या अधिकाऱ्यांना रामदासपेठच्या एका हाॅटेलमध्ये बोलावले असून तेथे निवृत्त अधिकाऱ्यासोबत अर्थकारणावर चर्चा पूर्ण झाल्यावर आवडीच्या ठिकाणी बदल्यांबाबत दावे केले जात होते.
हेही वाचा – धक्कादायक! रक्षकच झाला भक्षक, तक्रारीसाठी आलेल्या युवतीवर ठाणेदाराने केला बलात्कार
या निवृत्त अधिकाऱ्यासोबत कल्याण येथील एक पुरुष, तर नागपुरातील एका महिला अधिकारीही असून त्यांच्याकडूनच संबंधित निवृत्त अधिकाऱ्याला भेटण्याची पास मिळत असल्याचेही सांगितले जात होते. मुंबईहून आलेली व्यक्ती परिवहन खात्यात आठ वर्षांपूर्वी मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाली. तत्कलीन परिवहन मंत्र्यांसोबत भेटी-गाठी वाढल्याने ही व्यक्ती तेव्हाही चर्चेत होती. दरम्यान, नवीन सरकार आल्यापासून हा निवृत्त अधिकारी पुन्हा सक्रिय झाला असून आता थेट परिवहन मंत्र्यांशी जवळीक असल्याचे सांगून आरटीओच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवत असल्याची चर्चाही समाज माध्यमांवर रंगली होती. या अधिकाऱ्याला भेटणाऱ्यांच्या यादीतील किती अधिकाऱ्यांना कुठे पदस्थापना मिळते, आता याकडे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबत ‘त्या’ निवृत्त अधिकाऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो म्हणाला, मी माझ्या खासगी कामासाठी नागपुरात आलो होतो. परिवहन खात्यातून निवृत्त झाल्याने माझे काही मित्र नागपूर वा जवळच्या आरटीओत आहेत. त्यापैकी तिघांशी मी भेटलो. परंतु, त्याचा परिवहन खात्याशी संबंध नाही.