नागपूर : सोने, चांदीचे विक्रमी दर असतानाही नागपूरकरांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी शहरातील विविध सराफा व्यावसायिकांकडे गर्दी केली. दुचाकी-चारचाकी वाहने, गृह खरेदीसाठीही नागरिक घराबाहेर निघाले. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच व्यवसाय सुमारे २० टक्क्यांनी वाढल्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे.
गुढीपाडव्याला ग्राहकांचा सोने, चांदीचे दागिने, नवीन घर, विद्युत उपकरण गटातील दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशीन, ओव्हनसह इतर संच, नवीन घर, विविध प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहने खरेदीकडे कल होता. त्यामुळे शहरातील विविध भागातील व्यावसायिकांकडे ग्राहकांनी गर्दी केली. या व्यावसायिकांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे जास्त बचत कुठे होईल याचा शोध घेत ग्राहक बाजारात फिरत होते.
हेही वाचा – नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी
जिल्ह्यात गुढीपाडवा निमित्त पेट्रोल दुचाकीच्या तुलनेत विद्युत वाहनांसाठी मागणी होती. जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये गुढीपाडव्यानिमित्त सुमारे १ हजार विद्युत वाहनांसह पाचशेच्या जवळपास पेट्रोल दुचाकींची नोंदणी आधीच ग्राहकांनी केली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहन ग्राहक घरी घेऊन गेले. चारचाकी वाहनांमध्ये सुमारे ५०० पेट्रोल, १०० डिझेल तर १०० विद्युत वाहनांची विक्री झाली. शहरातील सगळ्या सराफा व्यावसायिकांकडे सुमारे २५० कोटींच्या दागिन्याची विक्री झाल्याचा अंदाज रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी वर्तवला. जिल्ह्यात सदनिका, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्हीच्या खरेदीवर अनेकांचा भर होता. काहींनी घर खरेदीच्या नोंदणीसाठी गृहनिर्माण प्रकल्पांना भेटी दिल्या. केवळ नोकरदारच नव्हे तर गृहिणींनी गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला पसंती दिली. यामध्ये मायक्रोवेव्ह, ओव्हन, फूड प्रोसेसर, भाज्या कापण्याचे युनिट, ज्यूसर, कणिक मळण्याचे यंत्र, रोटी मेकरचा समावेश होता.
हेही वाचा – काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत
गेल्यावर्षीहून २० टक्के जास्त उलाढाल
गुढीपाडव्याच्या निमित्ताने जिल्ह्यात गेल्यावर्षी सुमारे ५०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज शहरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी वर्तवला होता. यंदा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तानिमित्त सुमारे २० टक्क्यांनी उलाढाल वाढल्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे. त्यानुसार शहरात सुमारे २५० कोटींची सोने-चांदी- हिऱ्यांच्या दागिन्यांची उलाढाल, १२५ कोटींची विविध प्रकारच्या वाहनांची उलाढाल, १२० कोटींची सदनिका खरेदीची उलाढाल, १०५ कोटींची विविध प्रकारच्या विद्युत उपकरणांची उलाढाल झाल्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे.