नागपूर : मानेवाडा रिंगरोडवर तपस्या चौकात असलेल्या सेंट विंसेंट प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी रिंगरोडवर गर्दी करुन स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दुचाकी आणि सायकलीसुद्धा रस्त्याच्या खाली आणि पदपथावर ठेवत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या बाबीकडे शाळा प्रशासन आणि पालकांनीसुद्धा डोळेझाक करीत आहे.

मानेवाडा रिंग रोडवर तपस्या चौकात सेंट विंसेंट प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. ही शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरते. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी पुरेसे मैदान नाही तसेच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थासुद्धा नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी सायकली व शिक्षक त्यांच्या दुचाकी शाळेसमोरील पदपथावर ठेवतात. शाळेला दोन प्रवेशद्वार असले तरी ते लहान असल्यामुळे तेथे विद्यार्थ्यांची गर्दी होते. सकाळच्या सत्रात आलेले विद्यार्थी बारा वाजता शाळेबाहेर पडतात तर त्याच वेळी दुपारच्या पाळीतील विद्यार्थी शाळेत येतात. त्यामुळे एकाच वेळी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक बाधित होते. विद्यार्थ्यांच्या जीवाला यामुळे धोका उद्भवू शकतो. याकडे शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे तसेच पालक वर्गही याबाबत गांभीर्याने विचार करीत नाहीत. त्यामुळे एखादेवेळी मोठी दुर्घटना घडू शकते.

इमारत बांधकामाचाही धोका

या शाळेतील पटांगणातच बहुमजली मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. इमारतीवरुन साहित्य खाली पडल्यास विद्यार्थी जखमी होऊ शकतात. बांधकामाची जाळी नसल्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

शाळेला दुकानांचा वेढा

सेंट विंसेंट विद्यालयाचे प्रवेदशद्वार रिंगरोडलगतच असल्यामुळे शाळेला दुकानांचा आणि हातठेल्यांचा वेढा आहे. हेल्मेट विक्रीचे दुकान पदपथावर आहे तर बाजुलाच फळांचा रस विक्री करणारा ठेला लागला आहे. शाळेलगतच जोडे-चप्पल विक्रीचे दुकान आहे तर त्याशेजारी दुचाकी दुरुस्तीचे दुकान लागलेले आहे. या दुकानांमुळे रिंगरोडवरून धावणारी वाहने अगदी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळून भरधाव निघून जातात.

बसचा थांबा आणि प्रवेशद्वार

शाळेच्या अगदी प्रवेशद्वाराच्या बाजुलाच महापालिकेच्या ‘आपली बस’चा थांबा आहे. त्यामुळे सकाळी शाळेचे विद्यार्थी आणि बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी होते. तसेच भरधाव बस प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी थेट शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच थांबविल्या जाते. बसच्या थांब्यामुळे विद्यार्थी अनेकदा भीतीच्या सावटाखाली असतात.

“ रिंगरोडवरील शाळांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यात येते. विद्यार्थी आणि शिक्षकांनाही सूचना दिल्या जातात. कोणतीही अनुचित घटना घडू नये वाहतूक पोलिसांची गस्त लावण्यात आली आहे. ” -माधुरी बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

“ शिक्षक आणि पालकांनी मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला हवे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण ? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गांभीर्य दाखवावे. ” -अमर मोंढे (वाहन चालक)