अकोला : जिल्ह्यातील पातूर येथे डॉक्टर पतीने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. विल्हेवाट लावण्यासाठी मोटारीतून मृतदेह नेत असताना नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी तपासणी केली असता हा सर्व प्रकार समोर आला.वर्षा राजेश ठाकरे (३३, रा.पातूर) असे मृत महिलेचे, तर डॉ. राजेश ठाकरे असे आरोपी पतीचे नाव आहे. एका चारचाकी गाडीतून महिलेचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी नेला जात असल्याची माहिती चान्नी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाचा पाठलाग करत अडवले.

हेही वाचा : विवाहितेचा गर्भपात करून अर्भक जंगलात पुरले ; पती, सासू, सासऱ्यासह अन्य ७ जणांविरोधात गुन्हा

तपासणीदरम्यान गाडीत महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आरोपी पतीला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. उत्तरीय तपासणीच्या अहवालात महिलेचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. वर्षा ठाकरे यांची हत्या पातूर शहरातील त्यांच्या राहत्या घरात झाली असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे.

Story img Loader