शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तूर आणि कापसाच्या पिकांबरोबर गांजाची झाडेही लावली. अवैधरित्या सुरू असलेल्या या गांजाच्या शेतीबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून १६ लाख रुपयांची तब्बल २७७ गांजाची झाडे जप्त केली. ही कारवाई उमरखेड तालुक्यातील संतोषवाडी (निंगणूर) येथे करण्यात आली. या प्रकरणी आनंद गोवर्धन जाधव व उल्हास रतन जाधव, दोघेही रा. संतोषवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
आनंद आणि उल्हास जाधव यांनी आपल्या शेतात तूर व कापसाच्या पिकामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या शेतात छापा टाकला तेव्हा गांजाचे पीक आढळून आले. पोलिसांनी ही सर्व २७७ झाडे जप्त केली. या झाडांचे वजन २६६ किलो असून किंमत तब्बल १६ लाख २० हजार इतकी आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप भोस व त्यांच्या चमूने केली.