लोकसत्ता टीम

चंद्रपूर : माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे स्वागत एकाच विश्रामगृहात वीस फुटाच्या अंतरावर असलेल्या दोन वेगवेगळ्या अतिविशिष्ट खोल्यांमध्ये माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक व आमदार किशोर जोरगेवार समर्थक यांनी केले. सांस्कृतिक मंत्र्यांच्या स्वागतात भाजपातील हा असांस्कृतिकपणा समोर आला आहे. तसेच यानिमित्ताने भाजपातील गटबाजी विकोपाला गेल्याचे चित्रही दिसून आले.

राजुरा विधानसभा मतदार संघातील कोरपना तालुक्यात आदिवासी लोककला महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. या महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार निमंत्रीत होते. तसेच पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ.अशोक उईके, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रीत आहे. या कार्यक्रमापूर्वी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे शासकीय विश्रामगृहात भाजपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात हे स्वागत केले गेले.

शेलार प्रथमच चंद्रपुरात येत असल्याने त्यांचे स्वागतासाठी माजी मंत्री व बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार व समर्थक आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक देखील विश्रामगृहावर उपस्थित होते. सांस्कृतिक मंत्री शेलार व पालकमंत्री उईके यांचे विश्रामगृहात आगमन होताच मुनगंटीवार यांनी प्रवेशव्दारावर स्वागत केले. त्यानंतर व्हीआयपी खोली क्रमांक एक मध्ये समर्थकांसह पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन देखील दिले. मात्र याच वेळी आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक विश्रामगृहातीलच व्हीआयपी खोली क्रमांक एक च्या अगदी समोरील खोली क्रमांक दोन मध्ये बसलेले होते. मुनगंटीवार व त्यांच्या समर्थकांचा स्वागत सोहळा आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक संपल्यानंतर सांस्कृतिक मंत्री शेलार यांना खोली क्रमांक दोन मध्ये घेवून गेले. तिथे आमदार जोरगेवार यांचे समर्थक तथा महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंग ठाकूर, तुषार सोम व इतरांनी स्वागत केले.

यावेळी त्यांचे सोबत चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया देखील उपस्थित होते. एकाच पक्षाच्या मंत्र्याचे शासकीय विश्रामगृहातील दोन खोल्यांमध्ये दोन आमदारांच्या समर्थकांनी असे वेगवेगळे स्वागत केल्याने भाजपातील गटबाजी अतिशय टोकाला गेल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे महाकाली यात्रा, रामनवमी निमित्त माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर स्वतंत्र वेगवेगळ्या बैठका लावत असल्याने अधिकारी वर्ग चांगलाच त्रासला आहे. यानिमित्ताने गटबाजी उघडपणे दिसत असतांना आता तर पार्टी विथ डिफरन्स असे ब्रिद वाक्य असलेल्या भाजपात सांस्कृतिक मंत्र्यांचे स्वागत एकाच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये करित असल्याने राजकीय वर्तुळात या स्वागताची चांगलीच चर्चा रंगली आहे.